33 गुन्ह्यांतील संचालकांच्या मालमत्तेवर टाच

गुंतवणूकदारांची फसवणूक || आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई
33 गुन्ह्यांतील संचालकांच्या मालमत्तेवर टाच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था व खासगी कंपन्यांकडून ठेवीदार व गुंतवणूकदारांची फसवणूक झालेल्या 35 गुन्ह्यांचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून यापैकी 33 गुन्ह्यांत आरोपी असलेल्या पतसंस्था संचालक, कंपन्यांचे मालक व इतर आरोपींच्या मालमत्तांवर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. 33 पैकी 17 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. गुंतवणूकदार संरक्षण कायद्यांतर्गत (एमपीआयडी) या संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई सुरू केल्यामुळे आर्थिक घोटाळ्यांचे गुन्हे दाखल असलेल्या बँका व पतसंस्था संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून 49 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणूक व अपहार झालेल्या गुन्ह्यांचा तपास केला जातो. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या 35 गुन्ह्यांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. त्यातील 33 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या पतसंस्था संचालक, कंपन्यांचे मालक व अन्य आरोपींच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. यात 2015 पासून दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. एमपीआयडी कायद्यांतर्गत यापैकी 17 प्रस्ताव मंजूर झाले असून 14 प्रकरणांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. यात शासनामार्फत उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत या मालमत्तांवर बोजा चढवून त्याचा लिलाव केला जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार व मंजुरीनुसार ही कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने पाठवलेले 17 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. 14 प्रकरणात अधिकार्‍यांची नियुक्ती झाली आहे. यामध्ये सह्याद्री नागरी पतसंस्था (2015, नगर तालुका पोलीस ठाणे), श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्था (2017, राहाता पोलीस ठाणे), श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्था (2017, एमआयडीसी पोलीस ठाणे), व्यंकटेश नागरी पतसंस्था (2018, सोनई पोलीस ठाणे), श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्था (2018, पाथर्डी पोलीस ठाणे), श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्था (2018, नगर तालुका पोलीस ठाणे), श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्था (2018, नगर तालुका पोलीस ठाणे), अंबिका ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (2018, कोतवाली पोलीस ठाणे), व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (2018, सोनई पोलीस ठाणे), मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनी (2018, तोफखाना पोलीस ठाणे), रावसाहेब पटवर्धन पतसंस्था (2020, तोफखाना पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com