
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दोन दिवसांपासून राज्यातील शिक्षक संघटनांचे दोन स्वतंत्र अधिवेशन सुरू आहेत. यातील एक अधिवेशन हे रत्नागिरीमध्ये तर दुसरे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात सुरू आहे. यापूर्वी राज्यात कोणत्याही भागात होणार्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातून उपस्थित राहणार्या शिक्षकांची संख्या ही हजारांच्या संख्येत असायची, त्यावेळी अधिवेशन काळात जिल्ह्यातील 80 ते 90 टक्के प्राथमिक शाळा बंद असायच्या मात्र आता परिस्थितीत बदल झाला आहे. यंदातर एकाच वेळी राज्यातील बड्या शिक्षक नेत्यांनी भरलेल्या दोन अधिवेशनात जिल्ह्यातून विशेष रजा घेऊन अवघे 605 शिक्षक गेले असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्यस्तरीय नेते उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात शिक्षकांचे अधिवेशन सुरू आहे. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे रत्नागिरीमध्ये राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पूर्वी वर्षातून प्रत्येक वेळी संघ आणि समितीच्या अधिवेशनाला जिल्ह्यातून जाणार्यांची संख्या ही पाच ते दहा हजारांच्या पुढे असायची, शिक्षकांचे अधिवेशन म्हणजे झेडपीच्या शाळांना पाच दिवस सुट्टी देण्याची वेळ येत असत. त्यावेळी अधिवेशन काळात अध्यापन कसे करावे, याची चिंताच शिक्षण विभागाला असायची.
दुसरीकडे पूर्वीच्या अधिवेशनात शिक्षकांच्या किमान प्रमुख प्रश्न सोडले जायचे, यामुळे शिक्षक संघटना आणि सामान्य शिक्षकांमध्ये अधिवेशन म्हटले की उत्साहाचे वातावरण असायचे. ज्याठिकाणी अधिवेशन भरायचे त्याठिकाणी नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक गर्दी करून जिल्ह्याची ताकद दाखवून द्यायचे, मात्र आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. तर आता शिक्षक नेते देखील अधिवेशनाकडे गंगाजळी मिळवण्याच्या भूमिकेत दिसत असून पूर्वी अधिवेशनाला मदत म्हणून प्रत्येक शिक्षक हे 100 रुपये प्रमाणे पावती फाडून आर्थिक मदत करत, आता याच मदत पावतीवरील आकडा 700 रुपये करण्यात आल्याने आताच्या अधिवेशनला नेते आणि कार्यकर्ते अधिवेशन पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहत असल्याची चर्चा शिक्षकांच्या वर्तुळात सुरू आहे. त्याप्रमाणे अधिवेशनात नेत्यांकडून प्रश्न सुटत नसल्याने नगर जिल्ह्यातील सुज्ञ प्राथमिक शिक्षकांनी शिक्षकांच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याची देखील चर्चा आहे. नगर जिल्ह्यात सध्या शिक्षक समितीचे नेतृत्व संजय धामणे, शिवाजी दुशिंग, नितीन काकडे, वृषाली कडलग, सीताराम सावंत हे करत आहेत. तर शिक्षक संघाचे नेतृत्व डॉ. संजय कळमकर, आबासाहेब जगताप आणि सुदर्शन शिंदे हे करत आहेत.
अधिवेशासाठी विशेष रजा घेतलेले शिक्षक
अकोले 53, संगमनेर 28, कोपरगाव 10, राहाता 40, श्रीरामपूर 15, राहुरी 85, नेवासा 118, शेवगाव 14, पाथर्डी 17, जामखेड 13, श्रीगोंदा 91, पारनेर 42, कर्जत 17, नगर 65 अशा 516 जणांनी अधिवेशनासाठी विशेष रजा घेतली आहे.
शिक्षक संघाचे नेते म्हणून मिरवणारे संभाजी थोरात यांचा हेतू जिल्ह्यातील शिक्षकांनी ओळखलेला आहे. त्यांना शिक्षकांच्या प्रश्नासाठी अधिवेशन घ्यावयाचे नसून, त्यांना केवळ गंगाजळी गोळा करण्यातच रस आहे, हे राज्यातील सर्व शिक्षकांनी ओळखलेले आहे. त्यामुळे शिक्षकांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवलेली आहे. त्रैवार्षिक अधिवेशन घेण्याऐवजी शिक्षण परिषद आणि मेळावा या नावाखाली कोकणात लोक गोळा करून यांना फक्त पैसे गोळा करायचे आहेत. आमच्या काळात शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी नऊ ते दहा हजार शिक्षक त्रैवार्षिक अधिवेशनाला जात होते. शंभर टक्के जिल्ह्यातील शाळा बंद राहत होत्या. ती जादू आता संपलेली आहे. राज्य शिक्षक संघ गटबाजीने पोखरला गेला आहे.जिल्ह्यात तर तो नामशेष झाला आहे. आता भाकरी फिरविल्याशिवाय पर्याय नाही. गेल्या पंधरा वर्षांमध्ये राज्य संघाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांचा एक ही प्रश्न सुटलेल्या नाही. हे शिक्षक संघाचे मोठे अपयश आहे.
- रा.वि.शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ