
संगमनेर | तालुका प्रतिनिधी
मित्राच्या मोबाईलचा वापर करुन एकाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ‘रामायणा’वरील चर्चेत आक्षेपार्ह टिपण्णी केली. सदरचा प्रकार आठवडाभराने लक्षात आल्यानंतर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्याला त्याची कल्पना देत तक्रारही दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी नाईकवाडपुरा येथील सतरावर्षीय अल्पवयीन तरुणाविरोधात जातीय तेढ निर्माण करण्याचे कृत्य केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पंकज शिंदे या तरुणाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी (ता.४) सदरील तरुण समाज माध्यमातील इन्स्टाग्राम सोशल नेटवर्किंग या साईटवरील ‘रिल्स’ बघत होता. त्यातच एका तरुणाने शेअर केलेली रामायणावर आधारित एक रिल्स त्याच्या पाहण्यात आली. ती पाहून त्याखाली असलेल्या प्रतिसाद कप्प्यात (कमेंट) कोणी काय रिप्लाय दिलाय हे पाहत असताना शिंदे यांना ‘सुहान ७’ या नावाने इन्स्टाग्राम खाते असलेल्या एकाने कोट्यवधी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या राधा-कृष्णावर अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट केल्याचे त्यांना दिसून आले.
याबाबत शिंदे यांनी आपल्या मित्रांना माहिती देत सदरील इन्स्टाग्राम खाते कोणाचे आहे याचा शोध घेतला असता ते सुहान समीर खान याच्या नावावर असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार वादग्रस्त पोस्टबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्या मोबाईलवरुन मित्राने पोस्ट केल्याचे सांगितले. त्यानुसार पोस्ट करणार्या ‘त्या’ तरुणालाही फोन करुन बोलावण्यात आले. यावेळी त्याने आपणच मित्र सुहान खानचा मोबाईल घेवून सदरील पोस्ट केल्याची कबुली दिली. त्यावर हिंदुत्त्ववादी तरुणांनी ‘त्या’ दोघांनाही सोबत घेत थेट शहर पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकार पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना सांगितला. याप्रकरणी पंकज शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरुन शहर पोलिसांनी सतरावर्षीय तरुणाविरोधात आक्षेपार्ह कृती करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यावरुन भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०५ (२) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.