अहमदनगर (प्रतिनिधी) -

राज्यातील सर्व जिल्ह्यात क्रीडा संकुलात शुल्क निर्धारण निश्चित करून खेळाडूंना न्याय देण्याबाबतच्या अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ

व क्रीडा शिक्षक महासंघ नगर यांच्या मागणीचा तातडीने विचार करू, तसेच सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना शुल्क निर्धारणाबाबत आदेशित केले जाऊन वाढीव क्रीडा शुल्कास लगाम घालून खेळाडूंना न्याय दिला जाईल. त्याचप्रमाणे मुलींना नाममात्र शुल्क आकारले जाणार असल्याचे आश्वासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी दिले.

पुण्याच्या बालेवाडी येथे क्रीडा आयुक्त यांचे सोबत अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडा शिक्षक महासंघ नगर या संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी मैदाने/कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणी संदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड-एमपीएड-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षक नियुक्ती देण्याबाबत महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे यांनी अवगत केले. खेळाडू शिष्यवृत्तीतील वाढ, पंच मानधन, खेळाडू अपघात विमा, खेळाडू दैनिक भत्त्यात वाढ, ग्रामीण क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करणे, क्रीडा परीषदेवर 50 टक्के शिक्षक व संघटना प्रतिनिधी घेण्यात यावे, या मागण्या महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मांडल्या.

आठवीपर्यंतच्या खेळाडूंना मैदानावरील प्रवेश शुल्क व फी माफी अमंलबजावणी बाबत सहसचिव विलास घोगरे यांनी बाजू मांडली तर क्रीडा स्पर्धा विषयी महामंडळाचे निवृत्ती काळभोर व फिरोज शेख यांनी काही सुधारणा सूचविल्या. खेळाडूंसाठी मैदाने खुली करण्यासंदर्भात दिरंगाई होत असून लवकरात लवकर मैदाने खुली करावीत या बाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. बैठकीस उपस्थित सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक अनिल चोरमले, सहाय्यक संचालक सुहास पाटील, विजय संतान, अरूण पाटील यांनी शासन योजना व नियमावली या बाबत माहिती दिली. या बैठकीस दत्तात्रय हेगडकर, महादेव फाफाळ, बाबूराव दोडके, शेखर कुदळे आदी उपस्थित होते. फीट इंडिया अंतर्गत शाळांच्या नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असून सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन क्रीडा आयुक्त बकोरीया यांनी केले.