
भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी दुसरीकडे ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे परिसरातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. खोकरफाटा ते खानापूर रोडलगत असलेल्या सिडीवर्कचा पुल न बांधल्याने दहा एकर सोयाबीन पाण्यात आहे तर भोकर-अडबंगनाथ रोडवरही पावसाळ्यात पाण्याचा स्त्रोत असतानाही साईड गटार बांधल्या परंतू पुल बांधून सिमेंट नळ्या न टाकल्याने तेथेही पाच एकर सोयाबीन पाण्यात असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता हे शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.
भोकर शिवारातील भोकर फाटा ते श्रीक्षेत्र अडबंगनाथ देवस्थान रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पुलांचे काम झाले आहे. भोकर शिवारातील अल्लाबक्ष नबाबभाई पठाण यांचे गट नं.542 मधून लगतच्या मुठेवाडगाव शिवारातील गट नं.122 मध्ये हा रस्ता ओलांडून पावसाळ्याचे पाणी जाते परंतू आता या रस्त्याचे काम सुरू आहे. मजबुतीकरणामुळे रस्त्याची उंची वाढत आहे. पर्यायाने पावसाळ्यात जगतापवस्तीकडून येणारे पाणी आता अल्लाबक्ष पठाण यांचे शेतात साचत आहे.
या ठिकाणी पुलाचे बांधकामासाठी संबधीत ठेकेदाराने सिमेंटच्या नळ्या आणून पुलाचे काम सुरू केले होते परंतू लगतच्या काही शेतकर्यांनी तेथे नळ्या टाकून पुल बांधण्यास विरोध केल्याने ते काम रखडले. पर्यायाने नुकत्याच झालेल्या दमदार पावसाचे पाणी पठाण यांचे सोयबीनमध्ये साचले. त्यामुळे शेतकर्याची पाच एकर सोयाबीन पाण्यात आहे. पाण्याचा तातडीने निचरा झाला नाही तर पठाण यांचे पाच एकर सोयाबीनचे नुकसान होणार आहे. नुकसानीनंतरही शेती नापीक होण्याचा धोका आहे. शिवाय त्यांचे राहते घर, जनावरांचा गोठा व लगतच्या विहीरीलाही धोका होण्याची भिती पठाण यांनी व्यक्त केली आहे.
खोकरफाटा ते खानापूर रोडचे रूंदीकरण व डांबरीकरण झाले. यादरम्यान भोकर शिवारातील गट नं.376 मध्ये असलेल्या सिडीवर्कचा पुल ठेकेदार व सार्वजनीक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिला असतानाही त्याकडे संबधीतांनी दुर्लक्ष करत जुन्या नळ्यांवर माती लोटून तो सिडीवर्क बुजवून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबधीत शेतकर्यांनी लागलीच ही बाब सार्वजनीक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. गुजरे यांचे निदर्शनास आणून दिली. परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता येथे पुल नसल्याने रस्त्याच्या कडेला नळ्यांच्या तोंडादरम्यान वाहन गेल्यास अपघाताचा धोका आहे.
शिवाय या ठिकाणी जुना सिडीवर्क असतानाही येथे मोठ्या सिमेंट नळ्या न टाकल्याने व पुलाचे काम न केल्याने या लगतचे संजय विधाटे, राजेंद्र विधाटे, निवृत्ती विधाटे, बाळासाहेब गवारे, गणेश गवारे आदी शेतकर्यांची मिळून दहा एकर सोयाबीन पाण्यात आहे, येथेही पाण्याचा निचरा न झाल्यास पिकाचे नुकसान होणार आहे. भविष्यात या जमीनी नापीक होण्याचा धोका असल्याने प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालून या शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा संबधीत शेतकरी न्यायलयात दाद मागणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.