देयके अदा करा; अन्यथा विकासकामे बेमुदत बंद करू

ठेकेदार संघटनेचा इशारा : मनपा आयुक्तांसोबत चर्चा
देयके अदा करा; अन्यथा विकासकामे बेमुदत बंद करू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने ठेकेदारांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत अन्यथा शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे बेमुदत बंद करण्याचा इशारा महापालिका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेने दिला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड, उपाध्यक्ष शेख शोएब, उपाध्यक्ष अंबादास चौधरी, सचिव शेख शाकीर, प्रसिध्दी प्रमुख शहानवाज शेख आदी उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाचे नोंदणीकृत ठेकेदार व चेअरमन, मजूर सहकारी संस्थांनी दिवाळीपूर्वी वारंवार समक्ष भेटून व निवेदन देऊनही आपण आम्हाला धनादेश देण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची आतापर्यंत पूर्तता झालेली नाही. तरी प्रत्येक ठेकेदारास दोन लाखांचे धनादेश तातडीने देण्याबाबत संबंधितास आदेश व्हावेत. सर्वसाधारण सभा ठरावाप्रमाणे नगरसेवक स्वच्छ निधीतील देयके अदा करण्यात यावीत. शासनाच्या मुलभूत सुविधा योजनेच्या 30 टक्के रक्कम मनपा हिस्सा तातडीने जमा करण्यात यावा व ठेकेदारास देयके अदा करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा सर्व ठेकेदार मनपा हद्दीत चाललेले सर्व विकास कामे नाइलाजास्तव बंद ठेवतील. या निवेदनावर अनेक ठेकेदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com