ठेका असलेल्या कंपनीच्या कंत्राटी सुरक्षारक्षकांसह इतर कामगारांचे पगार दरमहा वेळेवर नाहीत

ठेका असलेल्या कंपनीच्या कंत्राटी सुरक्षारक्षकांसह इतर कामगारांचे पगार दरमहा वेळेवर नाहीत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थानकडे ठेका असलेल्या एका कंपनीच्या कंत्राटी सुरक्षारक्षकांसह इतर कामगारांचे पगार दरमहा वेळेवर होत नाहीत. नोव्हेंबर महिन्याचा पगार काल दि. 25 डिसेंबर रात्री उशिरापर्यंत झाले नाहीत. परिणामी अवेळी होणारे पगार कामगारांच्या कुटुंबियांचे आर्थिक गणिताच्या दृष्टीने असून अडचण नसून खोळंबा अशा स्वरूपाचे ठरत आहेत.

करोना महामारीमुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या या कंत्राटी कर्मचार्‍यांना दर महिन्याच्या एक ते सात तारखेपर्यंत पगार होतील, अशी अपेक्षा असते परंतु पगाराच्या प्रतिक्षेत दिवसेंदिवस उलटून जाऊनही वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचार्‍यांचे आर्थिक गणित नेहमीच ढासळत असते. तारखेच्या तारखेला वेळेत पगार न झाल्यास अनेक कर्मचार्‍यांना हात उसनवारी करण्याशिवाय पर्याय नसतो परंतु आता करोना महामारीने कोणीही मदत अथवा उसनवारी पैसे देत नाहीत. किमान वेळेवर पगार देऊन या कामगारांचे आर्थिक हाल थांबविण्याची नैतिक जबाबदारी व आद्य कर्तव्य संबंधितांचे असतानाही पगार वेळेवर करण्या संदर्भात ते दुर्लक्ष करतात की काही तांत्रिक अडचणींमुळे असे प्रकार घडतात.

साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने या कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेळेत पगार न करणार्‍या संबंधित कंपनीस अथवा कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नाही यासाठी दिरंगाई करणार्‍या संबंधितांना योग्य तो धडा शिकवून कंत्राटी कर्मचार्‍यांचे पगार दरमहा वेळेत होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी माफक अपेक्षा व मागणी कंत्राटी कर्मचार्‍यांची आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुपर हॉस्पिटल साई आश्रम एक व दोन तसेच पाचशे रूम भक्तनिवास या ठिकाणी जवळपास अंदाजे तीनशे ते सव्वातीनशे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांचे पगार हे महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या पुढे होत असल्याने सुरक्षा रक्षक हतबल झाले आहेत.

करोनाच्या काळात तुटपुंज्या पगारावर काम करून आपल्या संसाराचा गाडा ओढताना त्यांना नाकीनऊ येत होते. आता कुठेतरी थोडसं सुरळीत होत असताना त्यातही पगार वेळेवर न होता पूर्वीप्रमाणेच पुन्हा बेचे पाढे पंचावन्न होत असेल तर कंत्राटी कामगारांनी दरमहा पगार वेळेवर व्हावेत यासाठी दाद तरी मागायची कोणाकडे? पगाराच्या बाबतीत आवाज उठवायचा म्हटल तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो कारण.. जादा बोलेगा तो कान काटेगा.. अशी अवस्था झाल्यास आपल्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.

या भितीपोटी पगार वेळेवर होवो अथवा न होवो.. तेरी भी चूप और मेरी भी चूप हीच भूमिका अनेक कंत्राटी कर्मचार्‍यांना नाईलाजास्तव स्वीकारावी लागत आहे. इमानेइतबारे साई भक्तांना सेवा पुरवणार्‍या या कर्मचार्‍यांचा पगार दरमहा वेळेवर व नियमितपणे होणे गरजेचे आहे त्यासाठी साईबाबाच आता सर्वांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना साई बाबांकडे करण्याशिवाय कंत्राटी कामगारांकडे दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही हे तितकेच खरे होय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com