तोफखाना, सिद्धार्थनगर कंटेन्मेंट झोनमध्येच; कमलेश सोसायटी सील

रुग्ण संख्या वाढू लागल्याने नगरकरांना धास्ती : मध्यभागासह उपनगरांतही संसर्ग
कंटेन्मेंट झोन
कंटेन्मेंट झोन

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता तोफखाना आणि सिद्धार्थनगर येथील कंटेन्मेंट झोनची मुदत 14 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या कमलेश रो हाऊसिंग सोसायटी परिसरही बुधवारी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला.

नगर शहरात गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव परिसर, सिद्धार्थनगर, पद्मानगर, आडतेबाजार हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये तर त्याच्या परिसरातील दोन किलोमीटरचा परिसर बफर झोनमध्ये आहे. त्यामुळे लॉकडाऊन नसले तरी अर्धे शहर बंद अवस्थेत आहे. कोणत्या भागात किती रुग्ण सापडतील, याचा भरवसा नसल्याने रोज नगरकरांना अहवालांची प्रतीक्षा असते.

आपल्या भागात किती रुग्ण आहेत, याचीच चौकशी ते करत असतात. उरले सुरले दुकानेही बंद होण्याची धास्ती प्रत्येकाच्या मनात आहे. एखादा दिवस विना रुग्णाचा जात असला, तरी त्याच्या दुसर्‍या दिवशी एकदम मोठा आकडा येत आहे.

तोफखाना परिसरात मध्यंतरी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. त्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. त्याची मुदत मंगळवारी रात्री बारा वाजता संपली. मात्र या भागात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कायम आहे. काहींचे अहवाल येणे शिल्लक होते. ते पाहूनच कंटेन्मेंट झोन शिथिल करायचा का नाही, याचा निर्णय घेतला जाणार होता.

मात्र महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी एकूण परिस्थिती पाहता तोफखान्यासह कंटेन्मेंट झोनची मुदत संपत असलेल्या सिद्धार्थनगर येथे कंटेन्मेंट झोनला मुदतवाढ दिली आहे. आता या दोन्ही ठिकाणी 14 जुलैपर्यंत कंटेन्मेंट झोन कायम राहणार आहे. एवढेच नव्हे, तर पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या कवडेनगर परिसरातील कमलेश रो हाऊसिंग सोसायटीमध्येही कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला.

तसेच या वसाहतीच्या उत्तरेकडील कवडेनगर वसाहत, पेमराज सारडा महाविद्यालय परिसर, सिद्धार्थनगरचा उरला सुरला परिसर, जाधव मळा, गायकवाड मळा, पारिजात कॉलनी बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

तोफखाना, दिल्लीगेट लगत असलेल्या नालेगाव परिसरही सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. त्यामुळे दिल्लीगेट पत्रे टाकून बंद करण्यात आले आहे. दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्त्यावरील दोन्ही बाजू कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. नालेगाव येथील मुदत उद्या संपत आहे. गेल्या काही दिवसांत येथे रुग्ण सापडण्याचे प्रमाण तुरळक आहे. त्यामुळे हा परिसर खुला केला जाईल, असे मानले जाते. मात्र चितळे रस्ता बंद राहणार असल्याचेच सांगण्यात येते. नालेगावबाबत काय निर्णय होतो, याकडे तेथील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com