कंटेनर व मालवाहू टँकरची धडक दोघे जखमी, पाच जण बचावले

कंटेनर व मालवाहू टँकरची धडक दोघे जखमी, पाच जण बचावले

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर मालवाहू कंटेनर व 50 टन सिमेंट घेवून चाललेल्या मालवाहू टँकरची धडक होत भीषण विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जावून धडकला, तर मालवाहू टँकर रस्त्यावर उलटला. या अपघातात कंटेनर चालक व घराजवळील महिला असे दोघेजण जखमी झाली. गुरुवारी (दि. 27) सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

संगमनेरकडून कोपरगावच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर (क्र. एचआर 55 एएफ 3515) व लोणीकून नाशिकच्या दिशेने 50 टन सिमेंट घेवून चाललेल्या मालवाहू टँकरची ( क्र. एमएच 13 सीयु 3549) धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातात मालवाहू टँकरची चार चाके धडीसहित निखळली. अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जावून धडकला, दरम्यान कंटेनर चालक कंटेनरमधून कागदपत्रांची फाईल घेवून उडी मारून पसार झाला.

तर या अपघातात मालवाहू टँकर चालक बाबू दाऊद शेख (रा. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला, सदर जखमीस उपचारार्थ संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर घराजवळ उभी असलेली महिला विमल शंकर उपाध्ये (वय 55) ही महिला देखील जखमी झाली. घरावर कंटेनर धडकल्याने शंकर उपाध्ये यांच्या घरातील पाच सदस्य बालंबाल बचावले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. लक्ष्मण औटी सहित पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.

त्यानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात उलटलेला 50 टन सिमेंट भरलेला मालवाहू टँकर रस्त्याच्या बाजूला घेतला. अपघाताची घटना बघण्यासाठी चौफुली परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तळेगाव दिघे चौफुली परिसरात दि. 8 मे रोजी दोन मालवाहू ट्रकची धडक होत अपघात झाला होता, त्यावेळी आता ज्या घरावर कंटेनर धडकला, त्याच्या शेजारच्या दुकानावर मालवाहू ट्रक धडकला होता. त्या पाठोपाठ चौफुली परिसरात अल्पावधीत अपघाताची ही दुसरी घटना घडली. तळेगाव दिघे चौफुली परिसर अपघातप्रवण बनला असून अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी या परिसरातील डांबरी रस्त्यावर गावादरम्यान गतीरोधक टाकावेत, अशी मागणी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com