केंद्र शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे कन्झुमर पंप बंद पडण्याच्या मार्गावर

केंद्र शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे कन्झुमर पंप बंद पडण्याच्या मार्गावर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

केंद्र शासनाने कन्झुमर पंप चालकाचे पेट्रोल डिझेल दर खुल्या बाजारभावाने केल्याने कन्झुमर पंप बंद पडण्याच्या मार्गावर तर रिटेल पंप चालकांची पाचही बोटे तुपात असल्याचे चित्र महाराष्ट्रभर निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात रिटेल पंप चालक ग्राहकांना एक लिटर पेट्रोल प्रत्येकी 120 रुपये 50 पैसे तर डिझेल 103 रुपये 50 पैसे सरासरी भावाने विकत आहे. यात पंप चालकांना अडिच ते तीन रुपये कमिशन हिंदुस्थान इंडियन ऑईल पेट्रोलियम कंपन्यांद्वारे दिले जाते. कन्झुमर व रिटेल पंपाचे पेट्रोल डिझेल खरेदी दर सारखेच असताना गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने कन्झुमर पंप चालकाचे पेट्रोल खरेदी दरात 7 रुपये 50 पैसे तर डिझेल दरात 16 रुपये 50 पैशांची वाढ केल्याने कन्झुमर पंप चालक हतबल झाले आहेत. दुसरीकडे पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांचे केंद्र शासनाने नियंत्रण हटवल्यानंतर खुल्या बाजारात क्रुड ऑईलच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार कंपन्यांना भाव वाढविण्यासाठी दिलेल्या मोकळीकीमुळे केंद्र शासन पेट्रोलियम कंपन्यांचे हातचे बाहुले बनले आहे. केंद्र स्तरावर सहकार मंत्रालयाची स्थापना करायची दुसरीकडे राज्यात सहकारी तत्वावर उभे राहिलेले उद्योग मोडकळीस आणण्याचे धोरण अवलंबायचे. हा आम आदमीला दिलेला मोठा धोका आहे.

कंझुमर पंपावर विश्वासार्हता, इंधनाची योग्य मात्रा, परिणाम विना भेसळ, शिल्लक, जुना स्टॉक, भाव वाढला तरी त्याच दराप्रमाणे होणारी विक्री ग्राहक वर्गाची विश्वासार्हता आजही कायम आहे. रिटेल पंपावर सरकारने दाखवलेली मेहरबानी कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक करत आहे. गॅस वरील सबसिडी काढून घेतल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांनी चुलीचा वापर पुन्हा चालू केला आहे. हेच का अच्छे दिन? असा सवाल जनता विचारू लागली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com