बांधकाम क्षेत्राशी निगडित कामगारांचा शनिवारी संगमनेरात महाआक्रोश मोर्चा

बांधकाम क्षेत्राशी निगडित कामगारांचा 
शनिवारी संगमनेरात महाआक्रोश मोर्चा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

गौण खनिजबाबत शासनाने केलेल्या जाचक नियमांमुळे व कडक निर्बंधांमुळे यावर अवलंबून असलेले पुरवठादार, मजूर, कामगार यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत असून या सर्वांचा प्रचंड महाआक्रोश मोर्चा शनिवार दि. 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता यशोधन कार्यालयापासून निघणार असून प्रांत कार्यालयावर धडकणार आहे.

बांधकाम क्षेत्र हे पायाभूत विकासाचे क्षेत्र आहे. मात्र याबाबत नगर जिल्ह्यात आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले कामगार, मजूर, पुरवठादार यांची उपासमार होत आहे.तसेच बांधकाम साहित्याच्या झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे अभियंते, बांधकाम ठेकेदार, काम करण्यास कुठल्याच दृष्टीने परवडत नसल्याने त्याचा परिणाम प्रत्यक्ष जेसीबी मशीन मालक, डंपर, ट्रिपल, ट्रॅक्टर मालक व त्यांच्यावर अवलंबून असले खोदकाम मजूर यांचे काम उपलब्ध होत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील छोट्या शहरांपैकी संगमनेर तालुक्याची वाढ झपाट्याने होत आहे, परंतु शहराच्या वाढीत महत्त्वाचा वाटा असलेले बांधकाम क्षेत्र मोडकळीस आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. अशाच प्रकारचे जाचक शासन निर्णय व बांधकाम क्षेत्रास पूरक परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत लाखो मजुरांचे हाल होत राहणार असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे. यामुळे शासनाने या सर्व निर्णयांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा व हजारो संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावेत. याकरिता या विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये बांधकाम क्षेत्रातील अभियंते, शेतकरी, बांधकाम ठेकेदार, सेंट्रींग ठेकेदार, फरशी कामगार, ठेकेदार, खोदकाम, रंगकाम, इलेक्ट्रिक, प्लंबिंग सुतार, अकुशल कामगार व या विविध व्यवसायावर उपजीविका असणारे सर्व मजूर मोठ्या संख्येने महाअक्रोश मोर्चात सहभागी होणार आहे. तरी या विराट महाअक्रोश मोर्चा सर्व मजूर कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com