मतदारसंघातील जलसंपदाचे प्रश्न लवकरच सुटणार - आ. कानडे

मतदारसंघातील जलसंपदाचे प्रश्न लवकरच सुटणार  - आ. कानडे
आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत मतदार संघातील प्रश्नांकडे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले. हे प्रश्न तातडीने सोडण्याचे आदेश त्यांनी दिल्याने मतदारसंघातील जलसंपदाचे प्रश्न लवकरच सुटणार असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेऊन लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारसंघातील, विभागाकडील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीत आ. कानडे यांनी मतदार संघातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यवतील प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

बैठकीत आ. लहू कानडे यांनी, अत्यंत जुन्या अशा प्रवरा कॅनालच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तसेच श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतून जाणार्‍या कॅनालमधून टाकली जाणारी घाण, मृत जनावरे पालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठीच्या साठवण तलावात जमा होते. त्यामुळे श्रीरामपूरकरांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. म्हणून या कॅनालला लाइनिंग करावे किंवा अंडरग्राउंड पाईपमधून पाणी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.

तसेच राहुरी तालुक्यातील मुसळवाडी तलावात साचलेला गाळ व जलपर्णीमुळे दहा-अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने मुसळवाडी बंधारा दुरुस्ती व सुशोभिकरणासाठीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, अनेक वर्षापासून चारी क्रमांक 20 व 21 यातील गावांचे पाणीच बंद केल्याने नष्ट झालेल्या चार्‍या तातडीने दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या आ. कानडे यांनी केल्या.

त्यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एक एक मागणी बाबत अधिकार्‍यांकडून माहिती घेत सर्व प्रश्न तातडीने सोडण्याचे आदेश दिले. याबद्दल आ. कानडे यांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले. यावेळी जलसंपदा विभागाचे संचालक श्री.कुलकर्णी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता श्रीमती. अहिरे व सर्व कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता उपस्थित होते.

Related Stories

No stories found.