आ . रोहित पवार
आ . रोहित पवार

मतदारसंघातील कामांना गती द्या

आ. पवार यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत - जामखेड मतदारसंघातील बंधार्‍यांसह विविध विकास कामे प्रलंबित असून या कामांना गती द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आ. रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आसता या मागण्या केल्या. दरम्यान पवार यांची चौकशी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असतानाही पवार यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री फडणवी यांची भेट घेतल्याने याची उलट सुलट चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

दरम्यान या भेटीत डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी हे या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठवता येणार आहे. यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरीक्त आवर्तन मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्जत तालुक्यासाठी कुकडी प्रकल्प हा महत्त्वाचा असल्याने या कामाला गती देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने यामध्ये लक्ष घालून या कामाला गती देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली. यासोबतच कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही अनेक शेतकर्‍यांना मिळाला नाही. यातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

अहमदनगर जिल्ह्यातून वाहणार्‍या सीना नदीवर एकूण पंधरा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे कालबाह्य झाल्याने या बंधार्‍यांचे लातूर पद्धतीच्या बंधार्‍यात रुपांतर करण्यास महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली असून या कामालाही गती देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

सरकार हे कोणत्या पक्षाचे नसते, तर संपूर्ण जनतेचे असते. त्याअनुषंगाने मतदारसंघातील विविध प्रश्न सरकारदरबारी मांडून ते सोडवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. डिंभे-माणिकडोह बोगदा आणि बंधार्‍यांची कामे माझ्या मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळेल, असा विश्वास असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com