भाजपला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या ! -पाटील

सोनिया गांधींचे ‘पुन्हा एकदा काँग्रेस’चे स्वप्न प्रत्यक्षात आणू - ना. थोरात
भाजपला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या ! -पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे परंतु मागील 8 वर्षांत देशातील वातावरण पूर्णपणे बदलले असून जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात असून या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी पदाधिकार्‍यांना एच. के. पाटील मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिरातील ठराव व प्रस्ताव यांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक विषयावर आधारीत सहा गट विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायचे यासंदर्भात एक ठोस धोरण ठरवले व त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाईल. ‘एक व्यक्ती, एक पद’ या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. याबरोबरच राजकीय पातळीवरील आव्हानांचा सामनाही आपल्याला करावयाचा आहे. हा देश काँग्रेसच्या त्यागाने, बलिदानाने उभा राहिलेला आहे, परंतु आज देशच संकटात सापडलेला आहे. जेव्हा जेव्हा ‘हिमालया’वर संकट येते तेव्हा तेव्हा ‘सह्याद्री’ मदतीला धावतो हा इतिहास असून आज देशाला महाराष्ट्राची गरज आहे. आज पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाईल, असे नाना पटोले म्हणाले.

महसूलमंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करताना म्हणाले की, समतेचा संदेश देणार्‍या साईबाबाच्या पावन नगरीत काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा होत असून सर्व संतांनी समता, बंधूभावाचा संदेश दिला, माणसा-माणसात भेदभाव करू नये ही संतांची शिकवण आहे. काँग्रेसचा विचारही याच समतेच्या विचारावर आधारलेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनीही तोच विचार दिला असून तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा हा विचारच देशाला तारणारा आहे, पुढे घेऊन जाणारा आहे. काँग्रेसशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही म्हणूनच काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी पुन्हा एकदा ‘काँग्रेस’चा जो नारा दिला आहे तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन झाले व त्यानंतर प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. दुपारी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे दुसर्‍या दिवशी सादरीकरण होईल. सूत्रसंचालन उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com