काँग्रेसमुळेच महिलांना आरक्षण व सन्मान - आ. यशोमती ठाकूर

काँग्रेसमुळेच महिलांना आरक्षण व सन्मान - आ. यशोमती ठाकूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काँग्रेसचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. काँग्रेसमुळेच महिलांना आरक्षण व सन्मान मिळाला असून विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर तालुक्याने राज्याला सर्वांगीण विकासाचा संस्कार दिला असल्याचे प्रतिपादन माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आ. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वा हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित मथुरागिनी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सौ. कांचनताई थोरात, सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. शरयुताई देशमुख, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, सौ. लताताई डांगे, उत्कर्षाताई रुपवते, सौ. केशरबाई सानप, श्रीमती आंबाबाई मुंगसे, सौ. मीराताई शेटे, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. पद्माताई थोरात, प्रमिलाताई अभंग, सौ. बेबीताई थोरात आदी उपस्थित होत्या.

आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, थोरात परिवार हा संस्कारशील परिवार आहे. सर्वांचे आदर, गोरगरिबांचा सन्मान ही थोरात परिवाराची ख्याती आहे. या परिवारावर संगमनेर तालुक्याने भरभरून प्रेम केले असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याचे नेतृत्व करताना संगमनेरच्या रचनात्मक विकासाचा संस्कार राज्याला दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेसाठी अत्यंत चांगले काम केले. आपण अंगणवाडी सेविकांसाठी 15 हजार रुपये व मदतनीस यांच्याकरता 12 हजार रुपये मानधन मंजूर केले मात्र सध्याच्या खोके सरकारने या मानधनाला स्थगिती दिली आहे. सध्या आलेले हे अचानक सरकार हे स्थगिती सरकार आहे.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्यात समृद्धी आली. तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांतीतून देशात समृद्धी आणली. या महान विभूतीं बरोबर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या सर्वांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्याकरता जयंती महोत्सवाचा कार्यक्रम होतो आहे. काँग्रेस पक्षाने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. महिलांनी या आरक्षणातून आपली क्षमता सिद्ध केली असून आज विविध पदांवर महिला अत्यंत कार्यक्षमपणे काम करत आहेत. आपण सातत्याने गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. मात्र या तालुक्यातील शांतता काही शक्तींना पाहवत नाही म्हणून ते त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मात्र संकट काळातही आपण सर्वांनी भक्कम राहून राज्याला आपण ताकद दाखवू असेही ते म्हणाले.

यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे आहे. मोठ्या कष्टातून उभे राहिलेले तालुक्याचे कुटुंब असून हे सर्वांना जपायचे आहे.

कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मथुरागिनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले तर वृषाली साबळे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com