भाजपला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही, पक्ष बॅकफूटवर गेला? नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
भाजपला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही, पक्ष बॅकफूटवर गेला? नाना पटोले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?, भाजप बॅकफूटवर का गेली?, भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही काय? असे प्रश्न विरोधक म्हणून आम्हाला पडले आहेत, त्याची उत्तरे भाजपने दिली पाहिजे. तसेच भाजपने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना छुपा पाठिंबा दिला असेल तर त्याचे स्वागत करतो. आता काँग्रेस कार्यकर्ते याचा विचार 30 जानेवारीला करतील, असे सूचक भाष्यही पटोले यांनी केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची बैठक पटोले यांनी नगरमध्ये घेतली. या बैठकीनंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक पदवीधर मतदारसंघात दोन महिन्यांपूर्वी मी स्वतःडॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी मला भेटून डॉ. तांबे यांनी धन्यवादही दिले होते. माझ्याऐवजी मुलाला द्या, असे त्यावेळी तेम्हटले असते तर पक्षाने त्याचा विचार केला असता.

त्यांना दोन कोरे एबी फॉर्मही पाठवले होते. सेकंड ऑप्शन म्हणून डॉ. तांबेंच्या एबी फॉर्मवर सत्यजित तांबेंचेही नाव टाकता आले असते. पण शेवटच्या दिवसापर्यंत काय करणार, हे त्यांनी जाहीर केले नाही. तुमच्याही (माध्यमे) पुढे आले नाही व आमच्याकडेही आले नाही. पण, उमेदवारी भरायला दोघे पिता-पुत्र गेले व पित्याऐवजी पुत्राने अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि बाहेर आल्यावर फडणवीस यांनाही पाठिंब्यासाठी भेटणार असल्याचे जाहीर केले, यातून आम्ही काय समजायचे, असा सवाल करून पटोले म्हणाले, पक्ष बाहेरच्या दोघांतील वाद मिटवू शकतो, पण घरातील वाद कसे मिटवणार? त्यामुळे पक्षाला दोष देऊ नका व बदनामही करू नका.

पक्षाचे कोठेही चुकलेले नाही. आ. बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, विधिमंडळातील माझे गटनेेतेही आहेत.त्यामुळे त्यांना मी आदेश देऊ शकत नाहीत. पण पक्षाची लाईन काय आहे, हे त्यांना समजते व पक्ष हायकमांडच्या निर्णयाचे पालन व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोेरात यांची भूमिका काय, हे तुम्ही त्यांनाच का विचारत नाही? त्यांचे फोन सुरू आहेत. माझ्याशी ते फोनवर बोलतात, मग तुमच्याशी का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी पत्रकारांनाच केला.

काही गोष्टी झाकल्या आहेत

नाशिक पदवीधर उमेदवारीबाबत पक्षाला दोष देऊ नका, असा पुनरुच्चार करून पटोले म्हणाले, ज्या काही गोष्टी मी झाकल्या आहेत, त्याओपन करायला भाग पाडू नका, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, विधानसभेच्या पुण्यातील दोन पोटनिवडणुकांबाबत 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यपाल कोश्यारींना हटवलेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचा भाजपचाच अजेंडा आहे. सुजय विखें सारख्या पोरासोरांवरती बोलत नाही. राहुल गांधींना पप्पू संबोधणारा भाजपच आता पप्पू झाला आहे. बीबीसीने पंतप्रधान मोदींवर केलेली डॉक्युमेंटरी देशात दाखवू न देणे, ही लोकशाही आहे काय? देशात हुकूमशाही सुरू असून जनतेचा आवाज दाबला जात आहे,असा आरोपही पटोलेंनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com