
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
श्री क्षेत्र भगवानगड हा समाज सुधारकाचा गड आहे. संत भगवान बाबांनी या मागास भागातील पीडित बहुजनांच्या लोकांसाठी दिशा देण्याचे काम केले आहे. विशेष करून ओबीसी समाजासाठी संत भगवानबाबाचे मोठे काम आहे. राज्यात आणि देशात ओबीसी चळवळ उभी करण्यासाठी भगवानगडापासून सुरुवात करावी लागणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रथम भगवानगडावर येऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह भगवानगडावर येऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आ. राजेश राठोड, भानुदास माळी, राजेंद्र राख, अशोक पाटील, कल्याण काळे, इसुफ लीडर, राजेसाहेब देशमुख, केशर मोटवानी, सुशीला मोराळे, शुभांगी शेरकर, दादासाहेब मुंडे, बाळासाहेब सानप आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख, उपाध्यक्ष आनंद सानप, जालिंदर काटे, प्रकाश शेलार, आकाश काळोखे, मुन्ना खलिफा,राहुल ढाकणे, गणेश दिनकर, सुनिल दौंड, बाबासाहेब वाघ, सुभाष भाबड, पोपट बडे, वसंत खेडकर यांनी त्यांचे स्वागत केले.
पटोले म्हणाले, संत भगवानबाबांनी बहुजनांच्या उत्थानासाठी काम केले असून त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मी भगवानगडावर आलो आहे. ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी काम केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेणे हे आमचे काम आहे. लोकशाहीच्या मार्गाने मला मुख्यमंत्रीपद मिळाले तर संत भगवान बाबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम करायचे असून लोकशाहीतील सर्वात मोठी असलेली त्या खुर्चीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा हीच संत भगवानबाबांची विचारसरणी होती. बहुजनांच्या उत्थानाची प्रेरणा घेण्यासाठी मी भगवानगडावर भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे झालेला दसरा मेळावा आणि मी भगवानगडावर येणे हा फक्त योगायोग आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हत्या कटाचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना पटोले म्हणाले, सध्या राज्यामध्ये अतिशय वाईट राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रातील सरकार राज्याला बदनाम करण्याचं काम करत आहे.
नाशिक येथे झालेला अपघात हा रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये झाला असून या अपघातातील मृत्यूचे वाटेकरी हे राज्य सरकार आहे, असे सांगत मृत्यू झालेल्यांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सरकार आपलीच पाठ थोपटून घेण्याचं काम करत आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला गेले. बुलेट ट्रेनसाठी मोठे पॅकेज दिले. गुजरातवर एवढे प्रेम का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:च म्हणतात की ते मोदी व शहा यांचे हस्तक आहेत.
पुरोगामी महाराष्ट्राला हे कधीच मान्य होऊ शकत नाही. गुजरातला मदत करणारे हे राज्यातील सरकार आहे. स्व.गोपीनाथ मुंडे आणि मी सोबत काम केलं आहे. त्यांना इथून दिल्ली दिसायची ती वेगळी दिल्ली होती. मलाही येथून दिल्ली दिसते. मात्र, दिल्लीत बसलेल्या अत्याचारी व्यवस्थेचा नायनाट झाला पाहिजे असा आर्शिवाद भगवान बाबांकडे आशीर्वाद मागितला आहे, असे शेवटी पटोले म्हणाले.
भाजप सरकार आल्यापासून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, छोट्या व्यापार्यांना वार्यावर सोडले आहे. भाजपवाले स्वतःच्या मस्तीमध्ये जगत आहे. भाजपला मोठ्या प्रमाणात सत्तेची गुर्मी झाली आहे. देशाचा तिरंगा व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे पदयात्रेच्या माध्यमातून लढत आहे.