आजपासून शिर्डीत काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा

राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर दोन दिवस मंथन
आजपासून शिर्डीत काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत आजपासून सुरू होत आहे. 1 व 2 जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

शिर्डी येथील अतिथिगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसांचे नवसंकल्प शिबिर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत.

हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणीसंदर्भात रोडमॅप तयार करतील आणि त्यावर समूह चर्चा होईल तर दुसर्‍या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या कार्यशाळेला पक्ष प्रभारी एच. के. पाटील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित असतील, असे ना.थोरात यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, डॉ. जयश्रीताई थोरात आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com