अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत ‘दुजाभावा’च्या ठिणगीचा भडका!

अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत ‘दुजाभावा’च्या ठिणगीचा भडका!

अकोले (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोल्यातील करोना आढावा बैठकीतील गोंधळानंतर सुरू झालेला राजकीय आणि दुजाभावा सामना वाढीस लागला आहे. या प्रकरणावरून दोन्ही गटातील समर्थक सोशल मिडियावर एकमेकांवर तुटून पडले आहेत.

बुधवारी काँग्रेसने या प्रकरणासाठी आमदार डॉ.किरण लहामटे यांना जबाबदार धरले तर लहामटे यांनी थोरात यांच्याशी कोणतेही मतभेद नसून सोशल मिडियावर या प्रकरणावरून ना.थोरातांसह आपल्याविरूद्ध गरळ ओकणे बंद करा, असे आवाहन केले. वाद वेगळ्याच पातळीवर पोहचल्याचे या नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसून आले. काँग्रेसने तर तालुक्यातील राजकारण थेट राज्याचे सरकारपर्यंत जोडला. दरम्यान, हे प्रकरण तालुक्यात चर्चेचे ठरले आहे.

बोलविते धनी आमदार लहामटेच ; काँग्रेसचा आरोप : माफी मागा, अन्यथा संबंध तोडू

अकोले - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांचा धुडगूस घातला. मालुंजकरांचा बोलविता धनी आ. डॉ. किरण लहामटे हेच आहेत, असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे यांनी केला.

अकोले येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या करोना आढावा बैठकीनंतर सुरू झालेला वाद वाढला आहे. डॉ. अजित नवले यांनी याविषयावरून स्थानिक काँग्रेस नेत्यांवर नाव न घेता टिका केली होती. आता काँग्रेसने भूमिका जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मिनानाथ पांडे, बाळासाहेब नाईकवाडी, रमेशराव जगताप, चंद्रभान निरगुडे, शंकरराव वाळुंज, अरीफ तांबोळी, शिवाजी नेहे, संपतराव कानवडे, मंदाबाई नवले, विक्रम नवले, रामदास धुमाळ, साईनाथ नवले, उबेद शेख आदी उपस्थित होते.

वाकचौरे म्हणाले, महाआघाडीच्या तत्वाला छेद देणारे कृत्य त्यांनी केले. मालुंजकर हे अपरिपक्व आहेत. त्यांचा पदाचा राजीनामा घेऊन पक्षाने कारवाई करावी व माफी मागावी अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत कोणत्याच पातळीवर काम करणार नाही.

ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे म्हणाले, जेव्हा मंत्री तालुक्यात येतात. त्यावेळी त्यांचे स्वागत आमदारांनी करणे हा प्रोटोकॉल आहे. महाआघाडी सरकारमध्ये ना.थोरात यांचा मोठा वाटा आहे. सरकारच काँग्रेस मुळे आहे, हे लक्षात घ्यावे असे पांडे म्हणाले.

ना. थोरात यांनी अकोले- संगमनेर तालुक्यात कधीही दुजाभाव केला नाही, त्यांनी तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहे. हे अकोल्याची जनता विसरली नाही. दुही निर्माण करणे दोन्ही तालुक्याला परवडणारे नाही. काँग्रेसचा आ. लहामटे यांना आमदार करण्यात वाटा आहे हे विसरू नये.त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा. मित्र पक्ष म्हणविता आणि शिवसेना व काँग्रेस पक्षाला डावलण्याचा प्रयत्न करता ही बाब योग्य नाही, अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा मधुकरराव नवले यांनी दिला.

दोघांविरूद्ध गरळ ओकणे बंद करा ; डॉ.लहामटे : महसूल मंत्री थोरातांचे योगदान आहेच

अकोले - महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी कायमच मोठे योगदान आहे. ते नाकारता येणार नाही, पण सध्या जो सोशल माध्यमात आमच्या दोघांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो अतिशय खेदजनक आहे, असे मत आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

मालुंजकर गोंधळ प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या चुकीच्या गोष्टीमुळे राज्यभर चुकीचा मेसेज जात आहे. सोशल माध्यमातून या संदर्भात चुकीचे मेसेज फिरत आहेत. याबद्दल आ. डॉ. लहामटे यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या तालुक्यातील नेते मंडळींनी पत्रकार परिषद घेत आ. किरण लहामटेंवर टीका केली. या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.

सध्या संगमनेर-अकोले असा दुजाभावाचा निरर्थक वाद उभा केला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महसूलमंत्री थोरात हे अकोले तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांचा आणि माझा अगोदरच संपर्क झाला होता. त्यांनी अकोले तालुका असेल किंवा संगमनेर तालुका असेल असा कधी दुजाभाव केला नाही. अकोले तालुक्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचीही ग्वाही ना. थोरात यांनी दिली आहे. त्या आढावा बैठकीत जो गोंधळ झाला. त्याचे समर्थन करणार नाही. त्या व्यक्तीने भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करण्याची पध्दत नक्कीच चुकली. त्याबद्दल मी त्यांना समजही दिली आहे. त्या विषयी ना. थोरात यांच्याशीही चर्चा केली आहे. तरी काही नेते व कार्यकर्ते त्या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत. हे खुप क्लेशदायक आहे. सध्या चालू असलेला कठीण काळ बघता मी कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही. कुणीही चुकीच्या पद्धतीने राजकारण करू नये असे आवाहन आ. डॉ. लहामटे यांनी केले आहे.

ना. थोरात यांनी अकोले तालुक्या विषयी दुजाभाव केला नाही, ते राज्याचे नेते आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही चुकीचे मेसेज सोशल माध्यमात फिरवू नये, असे आवाहनही डॉ. लहामटे यांनी केले आहे.

नवले विरूद्ध नवले

काँग्रेसच्या पत्रपरिषदेत ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी माकपचे नेते डॉ. अजित नवले यांचे नाव न घेता टिका केली. ते म्हणाले, महसूलमंत्री ना. थोरात यांच्या बैठकीत जाणून बुजून गोंधळ घालून मिटिंग हाणून पाडण्याचा डाव होता. त्याचे समर्थन डाव्या विचारसरणीच्या नेत्याने करावे, ही आश्‍चर्याची बाब आहे. तालुक्यात कोणी एकटा आंदोलन करीत नाही. याचा मागे जाऊन इतिहास तपासावा, असा टोला त्यांनी लगावला. करोनाच्या गंभीर परिस्थिती आमदारांनी पालक मंत्री, आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे जाणे गरजेचे असताना शुल्लक आंदोलनात गुंतवून ठेवून भोळ्या आमदारांचा फायदा कोण घेते, याचा विचार खुद्द आमदारांनी करावा. रेमडेसिवीर वितरण व्यवस्थित केले नाही म्हणून राज्याचे अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्तांना पदावरून हटविले मग याला महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात जबाबदार कसे? असा सवाल त्यांनी केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com