
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वुई वॉन्ट आयटी पार्क, वुई वॉन्ट एम्प्लॉयमेंट, वुई वॉन्ट डेव्हलपमेंट, स्टॉप मायग्रेशन, स्टॉप ब्रेन ड्रेन अशी घोषवाक्य लिहिलेले फलक हातात धरत शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने एमआयडीसी कार्यालयासमोर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आयटी पार्क सुरू करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
नगर शहर व जिल्ह्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच रोजगार, उद्योग विकास, आयटी पार्कच्या मागणीसाठी कोणत्यातरी राजकीय पक्षाच्यावतीने अशा प्रकारचे उपोषण करण्यात आल्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. शहराचे आमदार, खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करण्यात आले असल्याचे शहर काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. सध्या प्रोफेसर चौकात संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यातच काँग्रेसने आयटी पार्कच्या मागणीसाठी एमआयडीसीत महापुरुषांच्या नावाने रोजगाराच्या मागणीसाठी उपोषण केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
यावेळी शहर काँग्रेसच्यावतीने एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या तथाकथीत खोट्या आयटी पार्कचा भांडाफोड काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी केला होता. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैयक्तिक, राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र शहरातील युवकांच्या रोजगारासाठी आणि उद्योग वाढीसाठी असे शंभर गुन्हे अंगावर घेण्याची काँग्रेसची तयारी आहे. पूर्वी सिलिकॉन व्हॅलीमध्ये अशाच पद्धतीने देशातील आयटी इंजिनियर स्थलांतरित व्हायचे.
मात्र आता देशांमध्ये पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर सारख्या शहरांमध्ये रोजगाराच्या, आयटीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्यामुळे ते प्रमाण कमी झाले आहे. मात्र, नगर शहरातून हा ब्रेन ड्रेन सुरूच आहे. स्थलांतर सुरू आहे. ते थांबणे गरजेचे आहे. यावेळी उपोषणात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, अल्तमश जरिवाला, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, समीर शेख, प्रणव मकासरे, शंकर आव्हाड, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, बिबीशन चव्हाण, मयूर भिंगारदिवे, आकाश डहाणे आदींसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.