
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून धुसफूस सुरूच असते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांना निधी न मिळणे, सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळणे अशा अनेक तक्रारी काँग्रेस मंत्र्यांनी मांडल्या आहेत. त्यातच आता 1 आणि 2 जूनला शिर्डीत काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे यासंदर्भात काही निर्णय घेतला जातो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मागील दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. ज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांडकडे मंत्री तक्रार करणार आहेत.
1 आणि 2 जून रोजी काँग्रेस पक्षाने आपले अधिवेशन शिर्डीत आयोजित केले आहे. शिर्डीतील काँग्रेस पक्षाचे अधिवेशन गाजणार आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत या अधिवेशनात निर्णय घेतला जाणार का? हे पाहण्याचे ठरणार आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे शिर्डी अधिवेशनावर लक्ष असणार आहे. कारण, या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला पाठिंब्याबाबत दिशा ठरणार आहे.
शिर्डी अधिवेशननंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे.
दिल्लीत सोनियांसोबतची बैठक लांबणीवर
महाविकास आघडीमध्ये काँग्रेस राहणार की जाणार? यासाठी काल दिल्लीत निर्णय होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली होती. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार होती. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेलं नव्हतं. मात्र, आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.