काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 9 ते 14 ऑगस्ट आजादी गौरव यात्रा - नाना पटोले

लोकशाही व राज्यघटनेच्या रक्षणासाठी काँग्रेसची लढाई
काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 9 ते 14 ऑगस्ट आजादी गौरव यात्रा - नाना पटोले

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

स्वातंत्र्यप्राप्ती व स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीसाठी काँग्रेसने अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले आहे. मात्र मागील आठ वर्षांत धार्मिकतेच्या नावावर राजकारण सुरू असून देशाच्या लोकशाहीला व संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरात दि. 9 ते 14 ऑगस्ट या काळात आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून लोकशाही वाचवण्यासाठीच पुन्हा एकदा काँग्रेसची लढाई सुरू असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शहराध्यक्ष किरण काळे, बाबासाहेब ओहोळ, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, करण ससाणे, मधुकरराव नवले, संजय छल्लारे, विनायकराव देशमुख, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, दादा पाटील वाकचौरे, डॉ. एकनाथ गोंदकर, संभाजी माळवदे, पंकज लोंढे, सोमेश्वर दिवटे, राहुल दिवे, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, संतोष हासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार पटोले म्हणाले, देशात बेरोजगारी व महागाईचा डोंब उसळला आहे. मात्र यावरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांवर सूड भावनेतून ईडीच्या कारवाया करत आहे. ईडी व तत्सम केंद्रीय यंत्रणा या पूर्णपणे राजकीय उद्देशातून वापरल्या जात आहेत. ईडीचा धाक दाखवूनच भाजपाने शिवसेनेतील आमदार फोडले असून महाविकास आघाडी सरकार पाडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा विविध वक्तव्यांमधून अवमान करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत. देशाच्या लोकशाहीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी काँग्रेस जणांनी पुन्हा एकदा मोठी लढाई करायची आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 14 ऑगस्ट या काळात होणार्‍या आजादी गौरव यात सर्व तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी सक्रिय सहभाग नोंदवत काँग्रेसचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवा असे आवाहनही त्यांनी केले.

तर आमदार थोरात म्हणाले, काँग्रेसला मोठ्या त्यागाचा व बलिदानाचा इतिहास आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या शाश्वत विकासाचा विचार करणारा पक्ष आहे. अनेक संकट आली तरीही काँग्रेसने सर्वधर्मसमभावाचा विचार सोडला नाही. ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशांमध्ये आता रॉकेटसारखे उत्पादन होत आहे. ही सर्व काँग्रेसची देण आहे. मात्र सातत्याने भूलथापा देऊन खोटे बोलून भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे. ईडीच्या कारवाई या राजकीय हेतूने होत असून हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून आजादी गौरव यात्रेनिमित्त प्रत्येक तालुक्यात पदयात्रा काढून काँग्रेसचा विचार हा घराघरात पोहोचवण्यासाठी काँग्रेसजणांनी सज्ज व्हावे असे सांगताना जिल्हा परिषद, पंचायत समिती व येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पदाधिकार्‍यांनी काँग्रेसचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे ,असे आवाहन त्यांनी केले

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, भाजप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करत आहे. अत्यंत चुकीच्या गोष्टी सातत्याने सांगून तरुणांना फसवले जात आहे. त्यामुळे या भुलथापांपासून तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना मोठी लढाई करावी लागणार आहे.

याप्रसंगी आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, किरण काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com