ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे दिल्लीत आंदोलन

भानुदास माळी : केंद्रातील सरकारमुळेच आरक्षण गेल्याचा माळींचा आरोप
ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे दिल्लीत आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. ओबीसीला त्यामुळे मोठा फटका बसला असून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख ओबीसी कार्यकर्ते दिल्लीला जाणार असून जंतरमंतर मैदानावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार असल्याची माहीती, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माळी नगर येथे आले होते. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंत गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अजय मिसाळ, गणेश आपरे, कौसर खान, जरीना पठाण, मंगल भुजबळ, रिजवाना पटेल, सुमन कालापहाड आदी उपस्थित होते.

माळी म्हणाले, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या संख्येचा इम्पेरिकल डाटा मागितला होता. मात्र, केंद्र सरकारने जाणीवपूर्वक तो सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला नाही. यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसीवर झालेल्या या अन्यायास सर्वस्वी भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे.

या देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घाणेरडे राजकारण करत आहे. आरएसएसचा केंद्र सरकारच्या आडून देशातील आरक्षण संपवण्याचा डाव आहे. यामुळे ओबीसींसह इतर आरक्षित असणारे सर्व घटक हे संतप्त झाले आहेत. याचाच उद्रेक होऊन दिल्लीमध्ये नाईलाजास्तव न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर मोर्चा काढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. बारा बलुतेदार, आलुतेदार यांना देखील ओबीसीच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम करत आहोत.

आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचाच व्हावा...

स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांचा आदेश आहे. यासाठी पक्ष संघटन मजबूत करत निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात उत्तमपणे काम करीत आहे. आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा अशी महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यासाठी संघटन मजबूत करून निवडणुका स्वबळावर लढत जिंकण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com