ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेसचा ठिय्या

आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन; आयुक्तांच्या घूमजावचा निषेध
ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेसचा ठिय्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर शहरात महापालिकेने जम्बो कोवीड सेंटर उभारण्यास सुरूवातीला संमती देणार्‍या आयुक्तांनी घुमजाव केल्याने काँग्रेसने आज आंदोलनाचे हत्यार उपसले. आयुक्तांच्या दालनासमोर शहरजिल्हध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून ऑक्सिजन मास्क लावून ठिय्या आंदोलन सुरू आहे.

24 एप्रिलला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये 1000 ऑक्सीजन बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली होती. त्याची दखल घेत मंत्री थोरात यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने अंमलबजावणीचा आदेश दिला. मात्र आयुक्तांनी अद्याप पर्यंत कोणतीच प्रगती त्यादिशेने केली नाही.

ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेसचा ठिय्या
हिंडफिर्‍यांची अँन्टीजेन

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यात या संदर्भात बैठक झाली. त्यात जम्बो कोविड सेंटरचा विषय मार्गी लावण्यासाठी तातडीने बजेट तयार करत कृती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता आपल्या दिलेल्या आश्वासनाला मनपा आयुक्तांनी घूमजाव केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसने महापालिकेच्या मदतीने ऑक्सिजन बेड सेंटर निर्माण करण्याची जबाबदारी उचलण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. सुरूवातीला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देणार्‍या मनपाने त्यातही खोडा घालत हात वर केले आहेत. काँग्रेसने अराजकीय व्यासपीठाच्या (नगर विकास मंच) माध्यमातून त्यासाठीचा लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अखत्यारीत असणार्‍या क्रीडा हॉस्टेलची (एक युनिट सुरू करण्यासाठी) या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र यावर अधिकारीस्तरावर काल सायंकाळी झालेल्या चर्चेत आयुक्तांनी महानगरपालिकेच्या विचाराधिन असा कोणताही प्रकल्प नसल्याचे म्हटले. ही माहिती समजताच आज शहरजिल्हाध्यक्ष काळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या घुमजाव करीत केलेल्या खोटारडेपणावर तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून विनाकारण घाणेरडे राजकारण सुरू आहे. राजकीय द्वेषातून पड्यामागून आमदार त्याला विरोध करत आहेत. सकंट काळात हा विरोध नगरकरांच्या जीवावर बेतेल याचेही भान आमदारांना नाही.

किरण काळे, शहरजिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com