अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पंचनामे करून तीन महिने उलटले तरी अतिवृष्टीने बाधित शेतकर्‍यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. बाधित शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, सन 2022 मध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सलग चौथ्या वर्षी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. परतीच्या पावसाने दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी अनेक ठिकाणी ढगफुटी झाली.

अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. शेतशिवारातील उभी पिके वाहून गेली. काढणीस आलेली पिके शेतातच सडून गेली. त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना देण्यासाठी अनुदान मंजूर केले आहे. त्याची रक्कम बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, असे स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com