
सोनई |वार्ताहर| Sonai
शिंगवे तुकाई येथील एमआयडीसीतील प्लॉटवरील दोन कंपनीच्या शेडचे एकूण 129 पत्रे चोरीला गेले आहेत. सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद देऊनही अजून तपास लागलेला नाही.
सोनई पोलीस ठाण्यात याची पहिली फिर्याद श्रीकृष्ण आबासाहेब काळे यांनी दिली की शिंगवे तुकाई येथील एमआयडीसी येथे प्लॉट नंबर पी 15 या ठिकाणी 10 बाय 50 फुटाचे पत्र्याचे शेड उभे केले. त्यावर 240 पत्रे बसवलेले होते.त्यामधील 45 हजार रुपये किमतीचे 45 पत्रे 15 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान चोरीला गेले आहेत.
दुसरी फिर्याद ललित विजय तळपे यांनी दिली. त्यात म्हटले की, शिंगवे तुकाई एमआयडीसीतील प्लॉट नंबर 10 येथील 21 बाय 18 फुटाचे पत्र्याचे शेड उभे असून त्यावर 42 हजार रुपये किमतीचे 84 पत्रे बसवलेले होते. हे सर्व पत्रे अज्ञात चोरट्याने 21 जानेवारी ते 27 जानेवारीच्या दरम्यान सर्व 42 पत्रे तसेच 11 फुटी लोखंडी पाईप चोरून नेला आहे. या दोन्ही फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
घोडेगाव, पांढरीपूल या परिसरात कायमस्वरूपी चोरीच्या घटना होत असल्या तरी पोलीस यंत्रणा वेगळ्याच कामात मग्न असून सोनई पोलीस परीसरातील गुन्हे गंभीर्याने घेत नसल्याचे बोलले जात आहे.
पांढरीपूल घोडेगाव वडाळा या परिसरात कायमच लुटमारीच्या घटना होत असतात. लोखंड, स्टील, डीझेल या प्रकारच्या लुटमारीच्या घटना कायमच्याच झालेल्या आहेत. फक्त कागदी घोडे नाचवून पोलीस यंत्रणा धन्यता मानत असते घोडेगावात पोलीस चौकी मंजूर झाली असली तरी या ठिकाणी पोलीस फक्त ठराविक दिवशीच दिसत असतात या कारणामुळे एमआयडीसीमध्ये व्यवसाय करण्यास नवीन व्यावसायीक येत नसल्याचे व्यावसायिक सांगतात.