
अहमदनगर (प्रतिनिधी)
नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या वादामुळे व जिल्ह्यातील काही बलाढ्य नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्हा विभाजनाच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत होऊ शकली नाही.
दक्षिण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या अशा या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा विभाजन समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी केले आहे. यासंदर्भात देशमुख यांनी आज भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
याबाबत माहिती देतानादेशमुख म्हणाले की, जिल्हा विभाजनाला मान्यता देणारा ठराव तत्कालीन पालकमंत्री व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन व विकास मंडळाने (डि.पी.डि.सी.ने) यापुर्वीच मंजूर केलेला आहे. राज्य शासनाने देखील तत्कालीन मुख्यमंत्री शरदराव पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात जिल्हा विभाजनाला मान्यता दिलेली आहे.
जिल्ह्यातील दोन टोकांच्या गावामधील (कर्जत तालुक्यातील सिध्दटेक ते अकोले तालुक्यातील घाटघर) अंतर २५० किमी पेक्षा जास्त आहे. प्रशासकीय कामकाजासाठी हे अतिशय अडचणीचे आहे. जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागाची स्थिती सर्वच बाबतीत अतिशय भिन्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना लोकसंख्या नव्हे तर जिल्हा घटक धरून बनविलेल्या आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील लोकांवर मोठा अन्याय होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा विभाजनाच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत होणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करणार
जिल्हा विभाजनाच्या निर्णयावर अंमलबजावणीसाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून याबाबत सरकारला साकडे घालण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांनाही विनंती करणार आहोत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची आपण भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.