कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

वडाळा येथील घटना || आरोपीस अटक
कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

गेटमध्ये रस्त्यात गाडी आडवी लावुन गाणे ऐकत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यास सुरक्षा रक्षकाने जाब विचारला व गाडी बाजूला घेण्यास सांगितले या गोष्टीचा राग मनात धरून तुला पाहून घेईल,अशी धमकी दिली व तेथून निघून गेला.त्यानंतर काल दुपारी 1 वाजता हा तरुण साधारण सात ते आठ अनोळखी लोकांना घेऊन आला व या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोड वरील अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेज येथे ही घटना घडली. कॉलेजच्या गेटवर ब्राम्हणे नावाच्या तरुणाने रस्त्यात गाडी लावून गाणे ऐकत होता. विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक पवन नानासाहेब हिवाळे यांनी त्यास गाडी बाजूला घे असे म्हटल्याचा राग मनात धरून ब्राम्हणे याने तीन दिवसांनंतर काल सहा जणांना बरोबर घेऊन लोखंडी गज, तलवार तसेच लोखंडी फायटर, कमरेचा बेल्ट सोबत आणून या सुरक्षा रक्षकाला खाली पाडून तोंडावर पाय ठेवत मारहाण केली. यावेळी कॉलेजचे शिपाई नवनाथ आसने, वाहन चालक सतीश सरोदे यांनी मारहाण करणार्‍या इसमाच्या तावडीतून हिवाळे यांना सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी सदर तरुणांनी आम्हाला नडायचे नाही, आम्ही येथे दादा (डॉन) आहोत. नाहीतर अशाप्रकारे मार खावा लागेल, आमच्या पोरांच्या नादाला लागू नको, यानंतर तुझे हातपाय तोडून टाकू,अशी धमकी दिली.

या सहा आरोपींपैकी वडाळा महादेव येथील सागर इंगळे, सोनू शिंदे व सागर वायकर या तिघांना सुरक्षा रक्षक हिवाळे यांनी ओळखले. या हाणामारीची माहिती श्रीरामपूर शहर पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस हवालदार संतोष परदेशी, रघुवीर कारखिले, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, प्रवीण कांबळे घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक पवन नानासाहेब हिवाळे यांनी फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजि. नं. 1026/2022 प्रमाणे ब्राम्हणे (पूर्ण नाव माहीत नाही) सागर इंगळे, सोनू शिंदे, सागर वायकर व अन्य तिघे यांच्याविरोधात भादंवि कलम 143, 147, 324, 323, 504, 506, 148, 149 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे 25 आणि कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com