
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
काल सायंकाळच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील डाकले कॉलेजच्यासमोर पेपर संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थ्याला व त्याच्या एका मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सरस्वती कॉलनी, देवकरवस्ती, वार्ड नं. 7, येथील निरंजन महादेव गाडे (वय 18) हा व त्याचा मित्र प्रसाद असे दोघे पेपर संपल्यानंतर सी.डी. जैन कॉलेज गेटच्या बाहेर आले असता आफताब, सोफीयान, आदित्य व त्याचा मित्र आणि मोसीन व आणखी एक अनोळखी मुलगा, सर्व रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर हे त्या ठिकाणी आले. त्यांनी आपणास शॉकपच्या पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली.
आपल्या पाठीवर रॉडने मारून एकाने हाताच्या उजव्या अंगठ्याजवळ चाकूसारख्या हत्याराने दुखापत केली. त्याचबरोबर आपला मित्र प्रसाद यालाही हातावर व डोक्यावर मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात निरंजन गाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आफताब, सोफीयान, आदित्य व त्याचा मित्र आणि मोसीन व आणखी एक अनोळखी मुलगा, सर्व रा. वार्ड नं. 2, श्रीरामपूर यांच्याविरोधात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहेत.