
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि पर्यटन स्थळे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. सहकाराची ओळख असलेल्या जिल्ह्याला आगामी काळामध्ये सर्वांगिण विकासाच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्याचा मानस नूतन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून पदाची सूत्रे बुधवारी नूतन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी स्वीकारली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. भौगोलिक परिस्थितीमध्ये ही विविधता आहे. काही भाग दुष्काळी तर काही भाग बागायती आहे. औद्योगिकरण आणि बिगर औद्योगिकरण याचे प्रमाणही विषम आहे. आदिवासी भागही या जिल्ह्यात आहे. या अगोदर जिल्ह्यामध्ये आपण राहुरी याठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एम.एस्सीचे शिक्षण घेतले आहे.
त्यामुळे माझी ही कर्मभूमीच आहे. जिल्हा हा प्रत्येक बाबींमध्ये अग्रेसर असून जिल्ह्याची ओळख राज्याला व्हावी. या दृष्टिकोनातून महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील अथवा प्रकल्प असतील ते प्राधान्याने राबवले जातील. तसेच सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच सर्वांचे योगदान घेतले जाईल. जिल्हा हा राज्यामध्ये कशा पद्धतीने पहिल्या क्रमांकावर राहील, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यामध्ये मी सुमारे अडीच वर्षे काम केले. मला जनतेने तसेच प्रशासनातील सर्वांनी व राजकीय मंडळींनी साथ दिली. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासामध्ये मला काम करता आले. काम करताना त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.