खाजगी हॉस्पिटलने ऑक्सिजनची व्यवस्था करावी

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या सूचना
खाजगी हॉस्पिटलने ऑक्सिजनची व्यवस्था करावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि अतिरिक्त 50 बेडची व्यवस्था कऱण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, खासगी रुग्णालयांनीही त्यांच्या क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करावी अथवा द्रवरुप ऑक्सिजन साठवणूक टाक्यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, पल्लवी निर्मळ, रोहिणी नर्‍हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, तिसर्‍या लाटेत करोनाचा वेग अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ऑक्सिजन तुटवडा जाणवू नये तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जिल्ह्यातच निर्माण व्हावा, यासाठी आपण ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय परिसरात करीत आहोत. या प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तताही होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, या प्रकल्पांच्या परिसरात पन्नास अतिरिक्त बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी शेडसची उभारणी सुरू आहे. हे कामही तातडीने व्हायला हवे, त्यांनी नमूद केले.

गर्दीवर नियंत्रण मिळवा

जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीण भागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यवाही करावी. गावांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी याबाबत अधिक दक्षता घेऊन नागरिकांना नियम पाळण्याबाबत अवगत करावे. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com