दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची अधिकार्‍यांना तंबी
दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

करोनाच्या तिसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी कामाला लागावे. संगमनेर ,अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. याबाबत मी अधिकार्‍यांना पुन्हा सांगणार नाही. ही शेवटची संधी देतो, करो या मरो याप्रमाणे काम करा नाहीतर कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज या तीनही तालुक्यांतील अधिकार्‍यांना दिला.

करोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन जोरदार कामाला लागले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी काल रात्री संगमनेर येथे संगमनेर, अकोले व पारनेर या तीन तालुक्यांतील अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. संगमनेर पंचायत समितीच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या. याप्रसंगी निवासी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते आदी मान्यवरांसह संगमनेर अकोले व पारनेर या तीन तालुक्यांतील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वाढलेला आहे. लसीकरणा अभावी एकही मृत्यू झाला नाही पाहिजे याची सर्व अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी. लसीकरणाबाबत काही जणांचा गैरसमज आहे. लसीकरणामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही याबाबत जनजागृती करावी. लसीकरणामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जबाबदार राहील असेच नागरिकांना सांगा. ग्रामीण भागात जनजागृती करा, गर्दीचे ठिकाण शोधून याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार्‍यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. तालुक्यातील सर्व सरपंचांची उद्या झूम मीटिंग घ्या आणि लसीकरणाबाबत त्यांना सूचना द्या, लसीकरण, तपासणी याबाबत वेगात काम करा अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.

राजेंद्र क्षीरसागर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. लसीकरणासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन करावे. पुढच्या दहा दिवसांत पहिला डोस मिळाला नाही असा एकही नागरिक दिसणार नाही यासाठी काम करा. जिल्ह्यातील 20 टक्के म्हणजे सुमारे सात लाख नागरिकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. आगामी काळात लसीकरण, टेस्टिंग व कोविड सेंटरची तयारी करा, असे क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते यांनी सूचना केल्या.

संगमनेरच्या तहसीलदारांना कानपिचक्या

जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना कानपिचक्या दिल्या. आपण प्रथम नागरिक असतो नंतर तहसीलदार असतो. लोकांशी नम्रतेने वागा त्यांची कामे नम्रतेने करा असे तहसीलदारांना सुनावले. आपल्याकडे काही तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने बोलतो असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com