अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखूमुक्त व्हावेत, यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानाची सर्व संबंधित

यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आवश्यक तेथे आर्थिक दंड आकारावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तंबाखूमुक्तीसाठीच्या विविध उपाययोजनांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते.

बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिलहाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे उपस्थित होते. बैठकीत, जिल्हाधिकार्यांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध व व्यापार कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन होईल याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे आणि या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करावी असे सांगितले.

सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, शासकीय आस्थापना परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची तसेच हुक्का व तत्सम पदार्थ विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याची सूचना केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी, विविध यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालाची माहिती दिली.

यावेळी जिल्हा एडस् नियंत्रण समिती, जिल्हा रुग्णालयाची रुग्ण कल्याण समिती, जिल्हा टी.बी.फोरम समिती, महात्मा फुले जनआरोग्य योजना समिती, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम समितीची बैठक पार पडली.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यास देण्यात आलेले उद्दिष्ट, यंत्रणांनी पूर्ण केलेले उद्दिष्ट, योजनांच्या अंमलबजावणीसाठी येणार्या अडचणी याबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीला महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.