आढावा, नियोजन अन् सूचना

जिल्हाधिकार्‍यांची तातडीची बैठक : आज पालकमंत्री नगरमध्ये
आढावा, नियोजन अन् सूचना

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा कहर वाढत असल्याने गुरूवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने जिल्ह्यातील महसूल, आरोग्य आणि मनपाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत करोना संसर्गाचा आतापर्यंतचा आढावा, पुढील नियोजन आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, आज सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ करोनाचा आढावा आणि उपाययोजना करण्यासाठी नगरला येत आहेत.

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वाढता आलेख पाहून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग चिंतेत आले आहे. याच पध्दतीने रुग्ण संख्या वाढत राहिल्यास अडचण होणार आहे. यावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि मनपा आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली.

यात करोना संसर्गासोबत करोनामुक्त होणार्‍यांची माहिती तातडीने सादर करा, लक्षणे नसणार्‍या मात्र बाधित रुग्णांना नगरला आणण्याऐवजी तालुका पातळीवर कोव्हिड सेंटरमध्ये ठेवा, यासह अन्य सूचना दिल्या. तसेच उपस्थित अधिकार्‍यांकडून काही अभिप्राय जिल्हाधिकारी यांनी घेतले असून करोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आवाहन त्यांनी केले.

दरम्यान गेल्या आठवड्यात ऑनलाईन बैठकीनंतर आज पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला येत आहेत. जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासह अन्य उपाययोजनांबाबत ते प्रशासनासोबत चर्चा करणार आहेत.

नगरमध्ये लॉकडाऊन का ?

पालकमंत्री हसन मुश्रीफ आजच्या दौर्‍यात नगर शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन काही दिवसांसाठी नगर शहर लॉकडाऊनची घोषणा करतात की काय याकडे सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वी झालेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना नगर शहरात लॉकडाऊन करायचे का याबाबत विचारणा केली होती. यामुळे पालकंमत्री नगर शहरातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

16 खासगी रुग्णवाहिका अधिग्रहीत

जिल्ह्यातील करोना बाधित आणि त्यांच्या संसर्गातील लक्षणे असणार्‍या रुग्णांची वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आणखी 16 खासगी रुग्णवाहिका अधिग्रहीत केल्या आहेत. यात नगर शहर 5, जामखेड 1, पारनेर 2, पाथर्डी 1, राहाता 1, कोपरगाव 1, कर्जत 1, संगमनेर 3 आणि नेवासा 1 यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com