शेवगावातही मुंडे समर्थकांचे सामूहिक राजीनामे

भाजप जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द : भगिनींना भाजपमध्ये डावलले जात असल्याचे कारण
शेवगावातही मुंडे समर्थकांचे सामूहिक राजीनामे

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) - केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा समावेश न झाल्याच्या निषेधार्थ शेवगाव भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे यांच्यासह भाजपच्या शेवगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे सुपूर्द केले. या राजीनामा नाट्याची तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मुंडे भगिनींना पक्षात डावलले जात असल्याचे कारण देत शेवगाव तालुक्यातील भाजप पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिले. स्व. मुंडे यांनी शहरात असलेला भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कन्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे या त्यांचा वारसा चालवत आहेत. परंतु पक्ष त्यांना वेळोवेळी डावलत असल्याचे दिसत असल्याने शेवगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात खा. प्रीतमताई मुंडे यांना मंत्रीपद मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. ही अपेक्षा भंग झाल्याने पदाचा उपयोग काय, अशा भावना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केल्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, महिला आघाडी अध्यक्ष आशाताई गरड, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वारकड, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र डमाळे, भाजपा उपाध्यक्ष गंगाभाऊ खेडकर, सरचिटणीस केशव आंधळे, सरचिटणीस संदीप वाणी, भाजपा कार्यालयप्रमुख कैलास सोनवणे, भाजपा उपाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सुभाषराव बडधे, अशोकराव आहुजा, सुनील रासने, सुधीर जायभाय, नवनाथ कवडे या पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे दिला.

दरम्यान बीडनंतर शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील काही पदाधिकार्‍यांनी राजीनामे सादर केले असले तरी बीडसह राज्यातील एकाही जिल्हाध्याक्षांनी राजीनामा दिलेला नाही.

जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे हे शेवगावचे असून पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे भगिनींचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही किंवा पत्रकार परिषद घेऊन साधे वक्तव्य केले नाही. जिल्हाध्यक्ष मुंढे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उद्या (दि. 13) रोजी मुंबई येथे होणार्‍या कार्यक्रमात पंकजा मुंडे काय भूमिका घेतात यानंतरच राजीनामा नाट्यावर पडदा पडेल. जिल्ह्यातील मुंडे समर्थक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.मुंबईच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com