नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात हुडहुडी

हवामान खात्याचा अंदाज
नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात हुडहुडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

थंडीला सुरुवात झाली असून चार दिवसांपूर्वी 17 अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा शुक्रवारी (दि. 11) 13 अंशावर आला आहे. नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात थंडी आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बरसात केल्याने पाणथळ क्षेत्रात पाणी आहे. यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका अधिक जाणवणार असल्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडील राज्यांमधील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रमध्येही हुडहुडी भरली आहे. पुणे, सातार्‍याबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. दिवसेंदिवस तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून थंडी वाढली होती. गतवर्षीही सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती.

यामुळे शेत शिवारातील पाणथळ क्षेत्रात पाणी साठलेले होते. हवेचा वेगही अधिक असल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत होता. पिकांवर दवही पावसासारखे जाणवत होते. गारठ्यामुळे दम्यासह त्वचारोगाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात वाढले होते. यामुळे जिल्हा रुग्णालयात वयोवृद्धांसह लहान मुलांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था केली होती. यंदाही थंडीचे प्रमाण अधिक जाणवण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची गरज आहे. दम्यासह त्वचारोगाच्या औषधाची उपलब्धता करावी लागणार आहे.

पुन्हा पाऊस ?

दुसरीकडे 14 तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे शेतकर्‍यांना धडकी भरण्यास सुरूवात झाली आहे. 22 तारखेपर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी अवतरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास त्याचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com