
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गेली अडीच वर्षे जिल्हावासीय करोना महामारीच्या सावटाखाली होते. आता पावसाच्या दमदार आगमनानंतर साथरोगांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील साथीच्या आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल, सर्दी, ताप, खोकला आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण अचानक वाढले आहे.
त्यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आली असून ज्यांनी करोनाचा दुसरी आणि बुस्ट डोस घेतलेला नाही, त्यांनी तो तातडीने घ्यावा, तसेच गरज वाटल्यास शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करोनाची चाचणी करून घ्यावी, असे सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान पाच वर्षांतील तुलनात्मक आढावा लक्षात घेता जिल्ह्यात सुमारे सव्वाशे ते दीडशे गावांना साथरोगाचा धोका असल्याची शक्यता आरोग्य विभागाच्यावतीने वर्तवण्यात आली आहे. यंदा मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. गेले पंधारवड्यात पावसाने नगर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून यामुळे नदी काठावरील गावांमध्ये साथीचे आजार सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आराखडा तयार केला आहे. तसेच 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.
पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढतात. सन 2018 मध्ये अकोले, संगमनेर, राहुरी, शेवगाव व पारनेर तालुक्यातील 6 गावांमध्ये डेंग्यु, गोवर, गॅस्ट्रो व रुबेला विषबाधेच्या आजाराची साथ आली होती. सन 2019 मध्ये कोपरगाव, श्रीरामपूर, नगर व श्रीगोंदे तालुक्यातील सहा गावांमध्ये ताप आणि डेंग्युची साथ आली होती. पावसाळ्यात नद्यांना पाणी आल्याने 122 गावे आणि खेडी पुरग्रस्त होतात. नैसर्गिक आपत्तीमुळे अशा गावांमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाणही वाढते.
साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाची तयारी पूर्ण झालेली आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा व महापालिका आयुक्तांनी शहरातील परिस्थितीचा याबाबत आढावा घेत आहेत. तसेच साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात 24 तास कक्ष कार्यान्वित आहे. याठिकाणी साथीच्या आजार व नैसर्गिक आपत्तीची माहिती संकलित करण्यात येत असून त्यानूसार त्वरीत उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या उपाययोजनांवर भर
सार्वजनिक विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याची जिल्हा, राज्य आरोग्य प्रयोगशाळांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. ब्लिचिंग पावडरच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेचा पाठपुरावा सुरू असून औषधांचा व इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच रुग्णांचे सर्वेक्षण व साथीच्या आजाराच्या रुग्णांवर, तसेच त्यांच्या संपर्कात येणार्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, याठिकाणी उपचारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वत्र सर्दी, ताप, खोखला, व्हायरल (विषाणूजन्य) आजारांचे प्रमाण वाढले आहे. संततधार पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच कोविडचा दुसरा आणि बुस्ट डोस तातडीने घ्यावा. सध्या सर्दी आणि ताप, तसेच व्हायरलचे लक्षणे आणि कोविडची लक्षणे सारखी असल्याने शंका असल्यास तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत कोविडची चाचणी करून घ्यावी. तसेच शक्यतो मास्कचा नियमित वापर करावा.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
जिल्ह्यातील स्थिती
जिल्ह्याची लोकसंख्या - 46 लाख
एकूण गावे - 1 हजार 602
संभाव्य पूरग्रस्त गावे - 122
संभाव्य आपत्तीग्रस्त लोकसंख्या- 2 लाख 50 हजार
शालेय विद्यार्थी सर्वाधिक आजारी
जिल्ह्यात सध्या प्रत्येक ठिकाणी शोलय विद्यार्थी आजारी असल्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरोग्य विभागाचे निरिक्षण आहे. एकतर या विद्यार्थ्यांनी कोविड डोस घेतलेले नाही. शिवाय शाळेत अनेक तास हे विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांसोबत एकत्र बसत आहे. यातून या विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असून यामुळे पालकांच्या डोक्याला ताप होतांना दिसत आहे.
9 दिवसात 63 हजार 395 डोस
सध्याचे वातावरण आणि वाढलेले सर्दी, तापाचे रुग्ण तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात येणार्या आवाहानामुळे गेल्या महिन्यांत रेंगाळलेल्या करोना लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. जिल्ह्यात 15 ते 23 जुलै दरम्यान 63 हजार 395 नागरिकांनी करोनाचा दुसरा अथवा बुस्टर डोस घेतलेला आहे.