
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्यानंतर तिसरी यादी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. डिसेंबरमध्ये या निवडणुका असल्याने तिसरी यादी प्रसिध्द होण्यास नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आघाडी सरकारने शेतकर्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागू करून थकित शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्यावर नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ योजना जाहीर केली होती. त्यातच आघाडी सरकार कोसळल्याने या योजनेच्या पूर्णतेबाबत साशंकता निर्माण झाली होती. नव्याने सत्तारुढ झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नवीन निकषांसह पुन्हा योजना सुरू केल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. या अंतर्गत पहिल्या लाभार्थ्याच्या यादीत जिल्ह्यातील 37 हजार व दुसर्या यादीत अवघ्या एका शेतकर्यांचे नाव होते.
तिसरी यादी कधी येणार याबाबत शेतकर्यांमध्ये उत्सुकता असतांना ग्रांमपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांची अचारसंहिता लक्षात घेता तिसरी यादी रखडली असल्याची चर्चा होत आहे. या दरम्यान उर्वरीत नावाचे आधार व खाते नंबर पडताळणीचेही काम हाती घेण्यात आले आहे.तसेच मयत वारस व इतर तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पोर्टलमध्ये दुरूस्ती करून संबंधीत तालुक्याचे अधिकारी यांचे पासवर्ड भरण्याचे काम सुरू असल्याची माहीती मिळाली आहे.