
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या खासदार नगर दक्षिणेचे डॉ. सुजय विखे यांना पत्रकारांनी गाठत प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत चक्क तोंडावर बोटच ठेवले. नेहमीच आपल्या आक्रमक आणि बेधडक विधानाने चर्चेत असलेले खा. विखे यांनी पत्रकारांसमोर चुप्पी साधल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्काच दिला.
खा.डॉ. विखे हे काल नगर तालुका दौर्यावर होते. दौर्यादरम्याने ते दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी कामनिमित्त आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर पत्रकारांनी त्या गाठत संवाद साधण्याचा प्रयत्न कला. मात्र त्यांनी नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुरू असून आदर्श आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे, असे कारण देत तोंडावर बोट ठेवले.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडला जातांना काही कालावधीसाठी शिर्डी विमानतळावर थांबले होते. त्यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत पालकमंत्री विखे यांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे.
राज्याचे राजकारणात नगरचे पालकमंत्री ना. विखे ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सक्रिय आहेत. आ. थोरात यांचे सख्खे भाचे सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढत असून यात विखे, उमेदवार तांबे यांना पाठिंबा देणार? याबाबत खल सुरू आहे. अशात खा. डॉ. विखे यांनी मौन बाळगणे पसंत केल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.