
टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून 4 ठिकाणी नाग निघाल्याच्या घटना घडत आहेत. ही नाग निघण्याची मालिकाच सुरू झाल्याने ग्रामस्थ व शेतकर्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गावाच्या चहूदिशेला असणार्या वस्त्यांवर आतापर्यंत नाग निघाल्याच्या घटना घडल्या. आठ दिवसांपूर्वी गावच्या पूर्वेकडील बाळासाहेब तोडमल यांच्या वस्तीवर जनावरांच्या गोठ्यात नाग निघून त्या नागाने शेळीच्या दोन करडांना दंश केला व त्यांना गिळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चारदिवसांनी गावच्या पश्चिम दिशेला असणार्या संदीप शिंदे यांच्या वस्तीवर नाग निघाला.
या घटनेनंतर 17 जून रोजी गावच्या उत्तरदिशेला असलेल्या अशोक कवाणे यांच्या वस्तीवर स्वयंपाक घरामध्ये सायंकाळी नाग निघाला. त्याच दिवशी रात्री 7 वा. गावच्या दक्षिणेला असलेल्या अशोक शिंदे यांच्या वस्तीवर घराच्या आवारात नाग निघाला. हे दोनही नाग सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना पाचारण करून पकडण्यात आले.
आतापर्यंत गावच्या चारही दिशेला नाग निघाले आहेत व वस्त्यांवर नाग निघण्याचे सत्र सुरू आहे. तर आता गावातही नाग निघण्यास सुरूवात होते की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत.