
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना अद्यापि शिक्षा झाली नसल्याच्या निषेधार्थ पानसरे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी (दि.20) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डावे पक्ष व संघटनांच्यावतीने एल्गार-जबाब दो आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. अॅड. बन्सी सातपुते यांनी दिली.
कॉ. पानसरे यांच्या हत्यार्यांना त्वरित जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृहखाते, त्यांच्या तपास यंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर करण्याची डावे पक्ष व संघटनांची मागणी आहे. या आंदोलनात सर्व पुरोगामी संघटना, डावे पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरोगामी विचाराचे कृतिशील विचारवंत कॉ. पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ 2015 मध्ये गोळीबार करण्यात आला.
ते व त्यांच्या पत्नी कॉ. उमाताई पानसरे गंभीर जखमी झाल्या. यातून कॉ. उमाताई बचावल्या; परंतु 20 फेब्रुवारी 2015 रोजी उपचारादम्यान कॉ. पानसरे यांचे निधन झाले. या घटनेला आता आठ वर्षे होत आहेत; मात्र त्यांची हत्या करणार्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. आजपर्यंत तपास विशेष तपास पथकाकडे (एस.आय.टी.) होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथकाकडे (ए.टी.एस.) सोपविण्यात आला आहे.
आता एटीएसचे अधिकारी तपास हाती घेताच न्यायालयातच म्हणतात फरार आरोपींना शोधणे कठीण आहे. म्हणजे अशा टोलवा-टोलवी मध्ये आणखी किती वर्षे लागणार? हा प्रश्न डावे पक्ष व संघटनांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. देशात भारतीय संविधान अस्तित्वात आहे, संविधानाने निर्माण केलेली न्यायालये आहेत. मात्र, ही न्यायालयेही कोणत्या दबावाखाली वेळकाढूपणा करत आहेत? ही बाब समजत नाही.
एकीकडे बिल्किस बानोच्या बलात्कारी गुन्हेगारांना मुक्त करण्यात येते आणि दुसर्या बाजूला उपेक्षित समूहाची बाजू घेणार्या वयोवृद्ध विचारवंतांना संशयित म्हणून तुरुंगात वर्षानुवर्षे सडविण्यात येत आहे. पानसरे-दाभोळकर यांच्या मारेकर्यांनाही मोकाट फिरण्याची मुभा मिळते.लोकशाहीवादी-धर्मनिरपेक्ष जनता म्हणून याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
- अॅड. बन्सी सातपुते, भाकप