‘सीएनजी’च्या खपाने स्पीड पकडला !

दरमहा मागणीत 5 टक्के वाढ || दररोज 40 ते 45 टन विक्री
‘सीएनजी’च्या खपाने स्पीड पकडला !

अहमदनगर |सचिन दसपुते| Ahmednagar

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला पर्याय म्हणून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसवर (सीएनजी) चालणार्‍या वाहनांचा वापर वाढला आहे. नगर जिल्ह्यात दररोज 40 ते 45 टन (40 ते 45 हजार किलो) सीएनजी गॅसची विक्री होते. पेट्रोल-डिझेल पंपावर सीएनजी गॅस वाहनांमध्ये भरून देण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात 42 पंपावर सीएनजी उपलब्ध आहे. दरम्यान, कारमध्ये सीएनजी गॅसचा वापर केला जात असला तरी अलिकडच्या काळात ट्रकमध्येही सीएनजी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. सीएनजी गॅसच्या मागणीत दर महिन्याला पाच ते सहा टक्के वाढ होत आहे.

सीएनजी इंधनाची किंमत ही पेट्रोल व डिझेलपेक्षा कमी असल्याने आणि किंमतीच्या तुलनेत मिळणारे मायलेज हे आकर्षक असल्याने सीएनजीवर चालणार्‍या वाहनांचा वापर वाढला आहे. पेट्रोल व डीझेलला हा स्वस्त, कार्यक्षम व अधिक पर्यावरणस्नेही पर्याय आहे. नगर जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून सीएनजीच्या मागणीत वाढ झाली आहे. दर महिन्याला पाच ते सहा टक्के वाढ होत आहे. महिन्याला सुमारे 1400 टन सीएनजीची विक्री होते. नगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील 41 पेट्रोल - डिझेल पंपावर सीएनजी वाहनांमध्ये भरून दिला जात आहे व श्रीगोंदा येथे एक स्वतंत्र सीएनजी पंप आहे. वाहनांमध्ये सीएनजी गॅसचा वापर केल्याने पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत 30 टक्के मायलेज वाढते तसेच प्रदूषण कमी होत असून इंजिनची लाईफ वाढते, यामुळे वाहनांचा वापर करणार्‍यांचा आर्थिक फायदा होतो. यामुळेच अलिकडच्या काळात सीएनजी कार वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

सध्या सीएनजी 94 रूपये किलो दराने मिळत असून मध्यंतरी हा दर 100 रूपये किलोवर गेला होता. युक्रेन युध्दामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा भाव वाढल्याने सीएनजी दरात वाढ झाली आहे. 94 रूपये किलोने सीएनजी मिळत असला तरी मागणी वाढत आहे. श्रीगोंदा येथून नगर जिल्ह्यातील पंपावर टँकरव्दारे सीएनजीचा पुरवठा केला जातो यामुळे दर अधिक आहे. भविष्यात पाइपलाईनव्दारे सीएनजी उपलब्ध करून दिल्यास दरामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

वाहनांमध्ये सीएनजी गॅसचा वापर केल्यास मायलेजमध्ये 30 टक्के वाढ होते. सीएनजी वापरामुळे प्रदूषण कमी होते. सध्या सीएनजी गॅसचा वापर कार बरोबर ट्रकमध्ये केला जात असून सीएनजीचा वापर वाहनचालकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

- युवराज फळे ( मॅनेजर सेल, भारत पेट्रोलियम गॅस)

आंध्र प्रदेश येथून श्रीगोंदा येथे सीएनजी गॅसचा पुरवठा पाईपलाईनव्दारे होतो. ती मुख्य पाईपलाईन आहे. तेथून नगर जिल्ह्यातील पंपावर टँकरव्दारे सीएनजीचा पुरवठा केला जातो. भविष्यात जिल्ह्यात पाईपलाईनव्दारे पुरवठा केला जाणार आहे. श्रीगोंदा येथून नगर व पुढे छत्रपती संभाजीनगरकडे पाईपलाईनने सीएनजी गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाईपलाईनने पुरवठा झाल्यास दरामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com