औरंगाबाद-शिर्डी विमानसेवा, तर नगरपर्यंतच्या रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

औरंगाबाद-शिर्डी विमानसेवा, तर नगरपर्यंतच्या रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अहमदनगर (बद्रीनारायण वाढणे)

सध्या औरंगाबाद-मनमाड-अहमदनगर (Aurangabad-Manmad-Ahmednagar railway line) असे २६५ किलोमीटरचे रेल्वेचे अंतर आहे. याला पर्याय म्हणून औरंगाबाद-अहमदनगर (Aurangabad-Ahmednagar railway line) असा ११२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे (Union Ministry of Railways) या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा (Varsha) निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. औरंगाबाद तसेच नगर एमआयडीसीमधील उद्योगाशी निगडीत मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सध्या रस्ते मार्गे होते. ती या प्रस्तावित रेल्वेमार्गे झाल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याची व्यवहार्यता तपासली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे या नवीन मार्गासाठी वेगाने पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गासाठी राज्य सरकारकडून सर्व ते सहकार्य देण्यात येईल स्पष्ट केले.

हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात अनेकदा आंदोलने झाली. अनेक लोकप्रतिनिर्धीनी पाठपुरावाही केला. आता मुख्यमंत्र्यानी या रेल्वे मार्गाबाबत लक्ष घातल्याने चालना मिळणार असलेतरी अर्थात अर्थसंकल्पात यासाठी किती तरतूद केली जाते यावर या मार्गाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे औरंगाबाद ते शिर्डी हे ११२.४० किलोमीटरचे काम वेगाने पूर्ण होत असून औरंगाबाद व शिर्डी विमानतळ जोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद-शिर्डी या मार्गावर विमान सेवा सुरु झाल्यास पर्यटकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार असून, याही पर्यायाचा विचार करावा असे सांगितले. याचा लाभ साईभक्तांना होणार आहे. या सुविधांमुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

नेवासा आणि शनि शिंगणापूरला होणार अधिक लाभ

औरंगाबाद नगर हा रेल्वेमार्ग साजापूर, वाळुंज, गंगापूर, - नेवासा आणि शनि शिंगणापूर या मार्गाने नगरपर्यंत जाणार आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास त्याचा थेट फायदा औरंगाबादसह मराठवाड्यातील तसेच नगर जिल्ह्यातील उद्योजकांना तसेच कृषी उत्पादित मालाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना होणार आहे. तसेच देवगड, नेवासा आणि शनिशिंगणापूर येथे मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील त्याचा लाभही नगर जिल्ह्याला होणार आहे. तसेच नगर, नेवासा, शेवगावातील अनेक तरूण औरंगाबाद येथील एमआयडीसीत रोजगारासाठी जात असतात. त्यांनाही लाभ होणार आहे. शिवाय दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे.

रोटेगाव - कोपरगाव मार्ग मागे पडणार

रोटेगाव-कोपरगाव या मार्गाची २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. पूर्वी रोटगाव-पुणतांबा या मार्गाची मागणी केली जात होती. परंतु, या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे रोटेगाव-कोपरगाव अशा ३५ किलोमीटर मार्गाचा पर्याय मांडण्यात आला. त्यास मंजुरीही मिळाली. परंतु, हा मार्ग सर्वेक्षणाच्या पुढे जात नसल्याची स्थिती आहे. आता नगर-औरंगाबाद रेल्वेमार्ग झाल्यास हा मार्ग मागे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com