मुख्यमंत्री पेयजलच्या 23 पाणी योजनांच्या कामाला मुदतवाढ

अध्यक्षा घुले : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री पेयजलच्या 23 पाणी योजनांच्या कामाला मुदतवाढ

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमा अंतर्गत प्रगतिपथावर व अपूर्ण योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या 23 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यास मुदतवाढ मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांनी दिली.

नगर जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजनांची 2314.67 लाख रुपयांची कामे प्रगतिपथावर आहेत. या 23 पाणी योजनांमुळे 160 वाड्या वस्त्यांना 16 हजार 237 नळजोडण्यांद्वारे पाणीपुरवठा करता येणार आहे. लॉकडाऊनमुळे ही कामे ठप्प झाली होती. राज्यात केंद्रशासन प्राणी जल जीवन मिशन राबवण्याचा निर्णय जुलैमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

जल जीवन मिशन योजना केंद्र व राज्य शासन 50-50 टक्के प्रमाणे राबवणार आहे. या मिशन अंतर्गत सन 2020- 21 च्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये नगर जिल्ह्यातील 1428.37 कोटी किमतीच्या 421 स्वतंत्र व पंचवीस प्रादेशिक अशा एकूण 446 पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.

या नळ पाणीपुरवठा योजनांद्वारे जिल्ह्यात एकूण 3,95,156 नळ जोडणी केली जाणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत सन 2024 अखेर जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना पाणीपुरवठा करता येणार आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, तसेच सर्व मंत्रिमंडळाचे जिल्हा परिषदेच्यावतीने अध्यक्षा घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, सभापती मीराताई शेटे, सभापती काशिनाथ दाते, सभापती उमेश परहर यांनी आभार मानले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com