ढगाळ हवामानामुळे कांदा पीक संकटात

दररोजच्या फवारणीमुळे शेतकरी हवालदिल
ढगाळ हवामानामुळे कांदा पीक संकटात
File Photo

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

सतत ढगाळ हवामान, कधी थंडी तर कधी पाऊस, तर कधी कडक उन अशा विचित्र हवामानात सध्या कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. कांदा रोपापासून ते कांदा लागवड झाल्यानंतर दर दिवसाला पिकावर फवारणी करावी लागत असल्याने यंदा सुरुवातीलाच प्रमाणापेक्षा जादा खर्च होऊ लागल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे.

गेल्या काही वर्षापासून उसा पेक्षा कांदा व कपाशी पिकाचे कमी दिवसात जादा उत्पन्न व जादा पैसा मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात वरील पिकांकडे वळले आहेत. परिणामी यंदाही कांद्याची विक्रमी लागवड झाली. कांदा लागवडीची सध्या झुंबड उडाली आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. परिणामी कांदा लागवडीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सरी पध्दतीने कांदा लागवड एकरी 10 ते 11 हजार रुपये दर आहेत. तर वाफा पध्दतीने 11 ते 12 हजार रुपयांचा दर चालू आहे.

त्यातच कांदा लागवडीसाठी येणार्‍या महिला मजुरांची जाण्या-येण्याची व्यवस्था रिक्षा किंवा टेम्पोद्वारे करावी लागत आहे. त्यातच इंधनाचे दर आभाळाला भिडल्याने वाहतुकदारांनी दरवाढ केल्याने अंतर किती आहे? हे बघून पाचशे ते हजार रुपये रोज वाहतुकीसाठी खर्च करावे लागत आहेत. त्यातच कांद्याचे रोप जर बाहेरुन आणायचे असेल तर रोप उपटण्याचे व वाहतुकीचे आणखी पैसे वाढतात. एकूण सुरुवातीलाच लागवडीचा खर्च पंधरा-सोळा हजारापर्यंत यंदा गेला आहे.

या अगोदर कांदा बी तीन हजार दोनशे ते साडेतीन-चार हजार रुपये किलोने विकत घ्यावे लागले. रोपासाठी वाफे तयार करुन त्यामध्ये एका पायली रोपाला म्हणजेच तीन किलो बियाणांसाठी एक गोणी रासायनिक खत 1700 रुपये, एक गोणी बुरशीनाशकांचे 2200 रुपये, वाफे तयार करण्याची मजुरी दीड हजार रुपये असा सुरुवातीला रोपे तयार करण्यासाठीच साधारणपणे आठ ते दहा हजाराच्या आसपास खर्च एक पायली साठी होत आहे. त्यातच मध्यंतरी पाऊस झाला. त्यानंतर धुके पडले. यामुळे रोपे पिवळी पडली. त्याला तीन ते चार वेळा महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागली, तो खर्च पाच हजार रुपये आला. यानंतर लागवड खर्च वरील प्रमाणे असा एकूण तीस हजार रुपये खर्च सुरुवातीला होत आहे.

या अगोदर रान तयार करण्यासाठी एक एकरासाठी नांगरट दोन हजार पाचशे रुपये, रोटा मारणे दोन हजार पाचशे, रासायनिक खताच्या एकरी पाच गोण्या त्याचा खर्च साडेआठ हजार रुपये. सरी पाडणे किंवा वाफे तयार करणे एकरी साडेतीन हजार रुपये, रानबंधणी खर्च तीन हजार रुपये असा हा खर्च लागवडी आधी सोळा ते सतरा हजार होत आहे. म्हणजेच रोपासह लागवड खर्च एकूण सुरुवातीलाच 45 ते 50 हजार रुपये होत आहे. त्यानंतर चार महिन्यात खुरपणी, तननाशक, किटकनाशक फवारणी हा खर्च वेगळाच. आणि ठिबक असेल तर ठिबकचा खर्च वेगळाच. याशिवाय ज्या दराने लागवड झाली, त्याच दराने कांदा काढणी दर घेण्यात येतो. काढणीनंतर वाहतूक खर्च, चाळणी करुन कांदा चाळीत भरुन ठेवण्यापर्यंत यंदा एकरी एक लाखाच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. यानंतर समाधानकारक भाव मिळाला तरच पैसे होणार! त्यात पुन्हा कांदा चाळीत टिकला पाहिजे. तो जर सडला तर तेलही गेलं अन् तूपही गेलं... अशी अवस्था होते.

लाखाने खर्च होऊन देखील शेतकरी कांदा लागवडीचे धाडस करत आहेत. बेसुमार फवारणीमुळे कृषीसेवा चालकांची मात्र, चांदी झाली आहे. काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे, कांदा दोन हजार रुपये क्विंटल गेला तरी साधारणपणे एकरी दोन लाख होतात. एक लाख खर्च गेला तरी चार महिन्यात एक लाख शिल्लक राहतात. याउलट उसाला 12 ते 15 महिने थांबावे लागते. इतके करुन देखील 50 टन उसाचे लाख सव्वालाख होतात. खर्च वेगळाच! त्यामानाने कांदा पीक परवडते. ना तोडीसाठी कोणाच्या पाया पडायचे, ना कोणाला ऊस तोडीसाठी पैसे द्यायचे, त्यापेक्षा कांदा बरा. यंदा कांदा पीक लवकर होण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी पैसे देऊन ऊस तोडून घेतला. त्यापेक्षा कांदा निघाल्यानंतर कपाशी करता येते. यंदा कपाशीचे पण चांगले पैसे झाले. म्हणजेच एक एकर उसाच्या जागेवर दोन पीक निघतात आणि उसापेक्षा कितीतरी जादा पैसे होतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com