श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजामुळे रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी तसेच कांदा काढणीसाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी पिके सोंगणीला वेग आला आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे.

आजपासुन मराठवाड्यासह इतर ठिकाणी तीन दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी पिकांच्या सोंगणीच्या तयारीला लागले आहेत. सध्या तालुक्यात रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी तसेच कांदा ही पीके काढणीला आली आहेत. काही दिवसांपासुन वातावरणात बदल झाला असून वातावरणातील आद्रता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांची सोंगणीच्या कामांनी वेग घेतला आहे. काही ठिकाणी हॉर्वेस्टरच्या साह्याने गव्हाची काढणी सुरू आहे. तर काही ठिकाणी मजुरांच्या साह्याने हरबरा, कांदा काढणीची कामे चालू आहेत.

हवामानाच्या बदलामुळे एकाच वेळी काढणीची कामे सुरू झाल्याने मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच मजूरीचे भावही वाढले आहेत. यंदा हॉर्वेस्टरचे भाव एकरी दोन हजारांवर गेले आहेत. तर मजुरही अडीच ते तीन हजार रूपये एकरी भाव सांगत आहेत. शेतकर्यांकडे पर्याय नसल्याने त्यांना मोठा भुर्दंड बसत आहे.

कांदा काढणीसाठी शेतकरी तसेच मजुरांची लगबग दिसत आहे. काढलेला कांदा साठविण्यासाठी कांदाशेडवर पानकागद टाकणे तसेच डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. अवकाळी पाऊस झाल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुररू आहे.