ढगफुटीने यंदा शेतकर्‍यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण

File Photo
File Photo

राहाता तालुका| Rahata

सोयाबीन निघाली की, विकून त्यांचे पैसे दिवाळीला होतील, मुलांना कपडे घेऊ, दिवाळी गोड करू, हे स्वप्न ढगफुटी सदृश पावसाने भंग केले आहे. सोयाबीन पाण्यात डूंबतेय त्याला कोंब फुटले! काढलेली सोयाबीन भिजली, तीचाही उबट वास सुटला. वाळवावी तर ऊन नाही. ओलसर सोयाबीन व्यापारी तरी घेणार कसा? कुणी काही म्हणो, पण यंदा शेतकर्‍यांच्या दिवाळीच्या आनंदावर पावसाने विरजण टाकले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यातच ढगफुटी सदृश पावसाने सर्व सिमा पार करत सर्वत्र दाणादाण केली. दोन तासांच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. आपल्या उभ्या हयातीत एवढा पाऊस कधी पाहिला नाही, असे अनुभव आता साठीच्या पुढील बुजुर्ग व्यक्त करतात. कर्ज काढल्याशिवाय पीक करता येत नाही, पीक असे अस्मानी संकटाने गेले की चिंता वाढते, कर्जाच्या व्याजाचे मिटर पळते आणि शेतकरी तिळ तिळ खचतो.

मान्सूनचा असला तरी अवकाळीच्या रुपातील या पावसाने मात्र शेतकर्‍यांची दैना चालवली आहे. खरिपात उशिराने आगमन केलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. दुर्दैवाने आताही शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, पण ते ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे. विदर्भ असो वा मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र असो वा कोकणपट्टी असो, पावसाने कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. मध्यंतरी खरिपातील सोयाबीन, कपासी, तूर, बाजरी, मका, भात ही पिके पावसाने ताण दिल्याने धोक्यात आली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची चातकासारखी वाट पाहिली जात होती.

पिके पाण्यावर आली असतानाच जुलैमध्ये पावसाचे सर्वदूर दमदार आगमन झाले. हातातून जाऊ पाहणारा खरीप हंगाम वाचला म्हणून शेतकरी सुखावला. खरीप चांगला साधला जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कधी नव्हे ती बहुतांश धरणे ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यातच भरली गेली. ओढे, नाले, विहिरी पाण्याने भरल्या गेल्या. पुढच्या नियोजनाचे आराखडे तयार केले. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.

पाऊस थांबता थांबेना. जोडीला ढगफुटी आणि पूरस्थितीमुळे पिकांचे नुकसान होऊ लागले. रोगराईच्या बंदोबस्त करण्याच्या खर्चात वाढ झाली. जास्त पावसामुळे पिकाच्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली तसेच शेतमालाचा दर्जाही खालावला. बंधारे, पाझर तलाव फुटले व जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली. काळ्या व जाड जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने पिके सडली. जमिनीची उपज कमी झाली. शेतातून पिकांची सोंगणी करण्यासाठी सुद्धा पाऊस उघडीप देईना. पिके काढण्यासाठी एकरी सात आठ हजारापर्यंत मजुरी वाढली गेली.

दररोज दुपारनंतर नित्यनेमाने येणार्‍या पावसाने काढलेल्या पिकाचे नुकसान झाले. काढलेले पीक सुरक्षित ठेवण्याची धांदल उडाली.

शासनाने खरे तर सरसकट पंचनामे करण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येक शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतमालाचा दर्जा खालावला आहे, सरासरी उत्पादन घटले आहे, रोगराई वाढल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भांडवली खर्च सुद्धा निघणार नाही, ही वास्तविकता आहे. पिकाचा घसरलेला दर्जा, सरासरी उत्पादनातील घट, अतिवृष्टीमुळे औषधांवरील वाढीव खर्च, निचर्‍या अभावी जमिनीची घटलेली उपज, क्षारांचे वाढलेले प्रमाण हे त्यांच्या गावीही नाही. या बाबींकडे दुर्लक्ष होत कामा नये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com