गृहविलगीकरण बंद करा, अन्यथा गुन्हे दाखल करणार

गृहविलगीकरण बंद करा, अन्यथा गुन्हे दाखल करणार

पाथर्डी तालुका प्रशासनाच्या नागरिकांना सक्त सूचना

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील करोना बाधित रुग्णांनी घरी न राहाता कोविड हेल्थ केअर सेंटर अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे. संबंधित करोना बाधित व्यक्ती घरात विलगीकरणात राहत असतील, तर गुन्हे दाखल केली जातील आशा सूचना तालुका प्रशासनाने दिल्या आहेत.

गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, दादासाहेब शेळके, बाळासाहेब तिडके, प्रमोद मस्के यांनी अचानक तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन करोना बाधीत रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

त्यांच्या भेटी घेऊन त्या रुग्णांनी तात्काळ त्यांच्यातील लक्षणानुसार कोविड सेंटर किंवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात जावे. अन्यथा संबंधितांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, अशी समज देऊन गावा गावात घरातील करोना बाधीत रुग्णांचा शोध घेऊन तात्काळ त्यांची रवानगी कोविड सेंटरला करण्यात आली आहे.

यावेळी गट विकास अधिकारी खिंडे म्हणाल्या, तालुक्यातील गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करणे आवश्यक असून कोणीही गृहविलगीकरणात राहू नये. करोना अहवाल पॉझिटिव्ह असेल किंवा करोनाचे सदृश्य लक्षणे आहेत. त्यांनी तत्काळ कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वतःहून विलगीकरण करावे व उपचार घ्यावीत. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

कुटुंबातील व गावातील इतर व्यक्तींना रोगाची बाधा होणार नाही. पंचायत समिती स्तरावरून यासाठी पथक तयार करून ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागातील दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा सभा देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली असून रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.पंचायत समिती पाथर्डी यांनी सुरू केलेले विशेष अभियान माझे गाव करोना मुक्त गाव अभियान याचा देखील यात समावेश आहे.

करोना काळात गावातील सर्वानी एकत्रित पणे येऊन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. करोना बाधीत व्यक्तीने घरात न थांबता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन स्वतंत्रपणे कोविड सेंटरच्या विलगीकरणात राहावे.

- सुनीता दौंड, सभापती, पाथर्डी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com