कोपरगावातील अवैध कत्तलखाने बंद करा

हिंदुत्ववादी संघटनांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
कोपरगावातील अवैध कत्तलखाने बंद करा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरात विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना पोलीस कडक शासन करत आहेत. मात्र रोजरोसपणे 50 गोवंशाची कत्तल होत असताना पोलीस प्रशासन झोपा काढत असून येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत शहरातील सर्व अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त झाले नाही तर कोपरगाव बंदचा इशारा आम्ही देऊ, असे प्रतिपादन गोरक्षक समितीचे प्रमुख अमित लोहाडे यांनी केले आहे.

संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी चाललेल्या गोवंश जातीच्या जनावरांची सुटका छापा टाकून पोलीस प्रशासनाने केली आहे. तसेच कोपरगाव शहरात देखील असे अनेक छापे टाकण्यात आले आहेत. मात्र 2018 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी 375 गोवंश जनावरे असे 21 हजार किलोची कत्तलखान्यात कत्तल होणार होती मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ही जनावरांची सुटका करण्यात आली होती. मात्र अद्याप शहरातील संजयनगर, सुभाषनगर भागात असे अनेक अवैध कत्तलखाने असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत आहे. याच्या निषेधार्थ शहरातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवार दि.12 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय, नगर पालिका, कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाणे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आदी कार्यालयांत निवेदन देत निषेध व्यक्त केला असून याबाबत अवैध कत्तलखाने बंद करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,अ‍ॅड जयंत जोशी, शिवसेना एस टी कामगार सेना शहर प्रमुख भरत मोरे, योगेश मोरे, सुनील फंड, अमित जैन, गुर्मीत दडीयाल , विनोद राक्षे, अनिल गायकवाड, नगरसेवक सत्यन मुंदडा, बालाजी आंबोरे, डॉ अमोल अजमेरे, अविनाश पाठक, डॉ तुषार गलांडे, सुशांत खैरे, अनिल गाडे, विक्रांत झावरे, विकास शर्मा, संतोष गंगावाल, योगेश उशीर, बापू काकडे, तुषार पोटे, शेखर बोरावके, संदीप डुंबरे, अल्पेश पवार, विशाल खैरे, बाळासाहेब साळुंके, सोनू यादव, राहुल साटोटे, कृष्णा दळवी, नगरसेवक अनिल आव्हाड, सागर सोमवंशी, अशोक नाईकवाडे, अशोक जोशी, पीयूष गंगावाल, योगेश पगारे आदींसह अनेक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, 31 तारखेपर्यंत सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त झाले नाही तर कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा कोपरगावातील कामाचा शेवटचा दिवस ठरेल. 3 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गायी कत्तलीसाठी चालल्या होत्या. त्यांची सुटका करण्यात आली याला जबाबदार कोण आहे. राजकारण्यांनी केवळ घोषणा करून नये. सर्व पुढारी मुस्लिम लोकांच्या मागे मते मागायला फिरतात. हे असेच सुरू राहिल्यास आपल्या बहिणींना रस्त्याने फिरणे मुश्कील होणार आहे. 31 तारखेपर्यंत कत्तलखाने उद्ध्वस्त झाले नाही तर त्या संजयनगर मध्ये मी जाऊन बसणार आहे. आपल्यात गुंडाची मानगूट धरण्याची हिम्मत नसेल तर आपण कसले हिंदू आहोत. फक्त मतांसाठी राजकारण करणारा मी नसून भविष्यात हे असेच सुरू राहिल्यास भारताचा तालिबान झाल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासन थातूर मातूर गुन्हे दाखल करत असून पोलीस ठाण्याच्या काही दलाल गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी.

एकाचवेळी कोणतेही कारण नसताना मार्केट कमिटीत 375 जनावरे सापडतात मार्केट कमिटीला लाज वाटत नाही का ? इथून पुढे मार्केट कमिटीचा बाजार संपल्यानंतर एकही जनावर कमिटीच्या आवारात आढळल्यास कमिटी बंद करू तसेच शहरात गो- माता चोरून नेण्याच्या घटना वाढलेल्या असून त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन चोरण्यात येत आहे.यावर कडक कारवाई करावी

- अमित लोहाडे

कोपरगाव शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासन नेहमी सज्ज आहे. पालिका प्रशासन या अवैध कत्तलखान्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी ठाम आहे. शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी पालिका सर्वोतोपरी प्रयत्न करून या वादाच्या कत्तलखान्यांवर कारवाई करू.

- शांताराम गोसावी मुख्याधिकारी

अवैध कत्तलखाने बंद करणे ही मागणी कायद्याला धरून आहे. कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी पालिका प्रशासनासोबत जी काही लागणारी सुरक्षा यंत्रणा आहे .ती घेऊन मी पालिका प्रशासनाच्या आगोदर दोन पाऊल पुढे राहील. कायदेशीर सर्व सहकार्य पालिका व गोरक्षकांना मिळेल व यावर लवकरच कारवाई करू.

- पोलीस निरीक्षक वासुदेव देसले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com