एक तारीख-एक तास मोहिमेत 12 लाख नागरिकांचा सहभाग

1 हजार 579 गावांत स्वच्छता अभियान
 स्वच्छता अभियान | Cleanliness Campaign
स्वच्छता अभियान | Cleanliness Campaign

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत रविवार (दि.1) रोजी जिल्ह्यात स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत जिल्हाभर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात 1 हजार 579 गावांत सुमारे 12 लाख लोक सहभागी होत, स्वचछता मोहीम राबवली. शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट महिला, युवक मंडळ, गणेश मंडळ यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवत गावातील परिसराची, शाळा अंगणवाडी, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.

दरम्यान, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे वैयक्तिक व सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामीण पातळीवर स्वच्छता ही महत्त्वाची असून लोकसहभागातून गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर मुख्य यांनी केले. स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत रविवारी जिल्ह्यात स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला स्वच्छतेचा उपक्रम सर्व शासकीय यंत्रणांनी राबवला यात स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण करणे, स्वच्छता रॅली पथनाट्य, दंवडी, फेसबुक, व्हॉटअप, इंस्टाग्राम विविध माध्यमे यातून वातावरण निमिर्ती करण्यासोबतच रविवारी प्रत्यक्षात गावोगावी सार्वजनिक स्वच्छता व सफाई करण्यात आली. यात पर्यटनस्थळे, वारसा स्थळे, शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील नाले, गटारी आदी ठिकाणी अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करण्यासाठी पुढाकार घेतला.

तसेच सिंगल युज प्लास्टीकचा वापर व दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यासोबतच शाळा स्तरावर रॅली, पथनाट्य विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. उपस्थित नागरिकांना स्वच्छता शपथ देण्यात आली. स्वच्छता चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे, यासाठी जनआंदोलन उभे राहिले पाहिजे, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी नवनागापूर (ता.नगर) या ठिकाणी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांच्यासह अधिकारी सहभागी झाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com